Advertisement
गोंदिया : लोकसभेतील पराभवानंतर भाजपला पहिला झटका बसला आहे. भाजपच्या माजी आमदाराने पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. माजी आमदार रमेश कुथे यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. रमेश कुथे काँग्रेसमध्ये जाणार असल्याची जोरदार चर्चा आहे. कुथे यांनी काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली होती. त्यामुळे कुथे यांचा कल काँग्रेसकडे असल्याचं सांगितलं जात आहे.
रमेश कुथे हे भाजपचे माजी आमदार आहेत. त्यांनी भाजपला रामराम केला आहे. रमेश कुथे हे पूर्वी शिवसेनेत होते. शिवसेनेतून ते दोनदा गोंदिया विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. सहा महिन्यांपूर्वीच त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. 2019च्या विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेची उमेदवारी देण्याचं आश्वासन दिलं होतं. पण ते पूर्ण केलं नाही, असं सांगतानाच पक्षात आलेल्या नवीन लोकांना सन्मान मिळत नसल्याचा आरोप माजी आमदार कुथे यांनी केला आहे.
