Advertisement
लक्ष्मणराव ढोबळे यांनी यांनी केले नियोजन: अनेक वर्ष रेंगाळलेल्या समस्या सुटल्या
मंगळवेढा : मंगळवेढा येथे माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी काम निपटारा शिबिर भरविल्यानंतर मतदारसंघातील सामान्य नागरिक तसेच शेतकर्यांनी मोठा प्रतिसाद दिला. ढोबळे यांनी नेहमीच सामाजिक उपक्रमांवर भर दिला आहे, आज झालेले जनता दरबार वजा शिबिरही त्याला अपवाद ठरले नाही. या शिबिराला हजारोंच्या संख्येने नागरिकांनी उपस्थिती लक्षवेधी ठरली, याच कारणातून ढोबळे यांनी विधानसभेची तयारी या शिबिराच्या माध्यातून सुरू केली की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे.
राज्य शासनाकडून शासन आपल्या दारी योजना राबविली जात असताना त्याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री तथा भाजपचे प्रवक्ते लक्ष्मणराव ढोबळे यांच्या प्रयत्नातून मंगळवेढा येथे जनता दरबार वजा काम निपटारा शिबिराचे आयोजन करण्यात आले होत. यामध्ये कृषि, महावितरण, तहसिल अशा आठ शासकीय कार्यालयाशी संबंधीत नागरिकांच्या तक्रारींचा निपटारा करण्यात आला. सोमवारी सकाळी ते संध्याकाळपर्यंत सुरू असलेल्याया शिबिरात एका दिवसात दोन हजारपेक्षा अधिक सामान्य नागरिक, शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी संबंधीत अधिकाऱ्यांकडे अर्जाद्वारे मांडल्या. शासकीय अधिकाऱ्यांनीही तातडीच्या समस्या सोडविल्या तर संबंधीत उपअभियंते, कर्मचारी यांनाही सूचना करण्यात आल्या.
माजी मंत्री ढोबळे यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे नियोजन करण्यात आले होते. मंगळवेढा येथील मुरलीधर चौकात नागरिक, शेतकरी यांच्या समस्या जाणून घेत त्यांची तीन ठिकाणी विभागणी करून शिशुविहार हॉल, कारखाना रोड तसेच जेवण विभाग सावली कार्यालय, दामाजी गृहनिर्माण या ठिकाणी समस्यांचा निपटारा केला जात होता. विशेष म्हणजे अडचणींच्या अर्जाला माजी मंत्री ढोबळे यांच्या स्वाक्षरीचे लेटरहेड जोडले जात होते. पंचायत समिती गटविकास अधिकारी, वीज विभागातील तक्रारींसाठी नागरिकांनी मोठी गर्दी होती. शासकीय कामातील अडचणी अतिशय किचकट असल्या तरी अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चांगले सहकार्य केले. कृषी अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालून शिस्तबद्ध पद्धतीने शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविले, तक्रारी जाणून घेतल्या. तहसील कार्यालयातील तक्रारींचाही निपटारा करण्यात आला. जवळजवळ ५०० अर्ज अद्यापही शिल्लक असून या तक्रारी अर्जांचा निपटाराही लवकरच करण्यात येणार आहे. दरम्यान, शासकीय कार्यालयीन कामे वेगाने होण्यासाठी माजी मंत्री ढोबळे यांनी आयोजित केलेल्या या शिबिराला प्रचंड असा प्रतिसाद मिळाला, नागरिकांनी विशेषत: शेतकऱ्यांनी या शिबिराच्या आयोजना बाबत माजी मंत्री ढोबळे यांचे आभार मानले.
