Advertisement
सोलापूर : नीट परीक्षा घोटाळ्यातील धागेदोरे फक्त दिल्ली, यूपीपुरते मर्यादित राहिलेले नाहीत. तर हे धागेदोरे आता महाराष्ट्रापर्यंत येऊन पोहोचले आहेत. या घोटाळ्याप्रकरणी लातूरमधील एका शिक्षकाला अटक करण्यात आली आहे. हा शिक्षक लातूरमध्ये शिकवत असला तरी तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील माढा येथील रहिवासी असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे माढातही त्याचं जाळं किती पसरलंय याचा तपास करण्यात येणार आहे. आपल्या गावचा शिक्षकही नीट घोटाळ्यातील आरोपी निघाल्याने माढात उलटसुलट चर्चांना उधाण आलं आहे.
नीट परीक्षा घोटाळ्यात माढा कनेक्शन समोर आलं आहे. नीट परीक्षा घोटाळ्याच्या प्रकरणात अटक केलेला संजय तुकाराम जाधव हा शिक्षक माढा तालुक्यीतील टाकळी गावच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. शाळा सुरू झाल्यापासून तो शाळेकडे फिरकलेला देखील नव्हता. टाकळीच्या शाळेवर पोटशिक्षकाची नियुक्ती करुन संजय जाधव तूरमध्ये क्लासेस घेत होता, अशी माहिती समोर आली आहे. उपशिक्षकाचे नाव नीट परीक्षा कनेक्शनमध्ये आल्याने सोलापूर जिल्हाच्या शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. संजय जाधवचे आणखी कोण साथीदार माढ्यात आहेत का? याचा तपास करण्याची गरज आहे. संजय जाधवच्या पाठिमागे कोण राजकीय व्यक्ती अथवा अधिकारी आहेत का? याच्या सखोल चौकशीची मागणी होत केली आहे.
