#

Advertisement

Wednesday, June 26, 2024, June 26, 2024 WIB
Last Updated 2024-06-26T10:36:13Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

ऍड. कोमलताई यांनी पत्रातून मांडली "शिक्षण व्यवस्थेबद्दलची अनास्था..."

Advertisement



राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीदिनी व्यक्त केले मनोगत 


राजें...

मानाचा मुजरा...!

मी सौ. कोमल अजय साळुंखे. मंगळवेढ्याची लेक आणि कहाडकरांची सून. माझा बा शिक्षक हुता. तुमच्याच विचारांची वाट चालणारा हाडाचा शिक्षका आजही वयाच्या 72 व्या वर्षी समाजाला शहाणपणाच्या चार गोष्टी सांगण्यासाठी त्यांची धडपड सुरु असतीया. प्रा. लक्ष्मणराव ढोबळे त्यांचं नाव. बहुजन समाज शिकून आयुष्यात पुढ गेला पाहिजे, ही त्यांची तळमळ होती. म्हणूनच मोठ्या कष्टानं माझ्या बानं तुमच्याच नावानं शाहू शिक्षण संस्था उभी केली. राजें... आपण जशा गावागावात शाळा सुरु केल्या, तशाच त्यांनी पण एक- एक करत महाराष्ट्रभर शाळा बांधल्या. वसतिगृह सुरु केली. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून मी शिक्षण क्षेत्रात जमेल तेवढ चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतेय. माझे अनुभव तुम्हाला सांगावेत, यासाठी हा पत्रप्रपंच.

राजं... आज तुमची जयंती अवघं 48 वर्षांचं आयुष्य तुम्हाला लाभलं. त्यातही फक्त 28 वर्षांच्या कारकिर्दीत सामाजिक आणि शिक्षण क्षेत्रात उत्तुंग कामगिरीचा डोंगूर उभा करणारं फक्त तुम्हीच एक राजं!


राजं... तुमच्या कार्यकर्तृत्वाचा हा डोंगूर निस्ता सांगून संपता संपणार न्हाई. इतकं अफाट काम तुमी बहुजनांसाठी करून ठेवलय बगा!


आपल्या काळात ब्रिटिशांनी संस्थानिकांवर अनेक बंधने लादली. मांडलिकत्व लादून अनेक प्रकारच्या मर्यादा घातल्या. अशा परिस्थितीत देशभरातले संस्थानिक फकस्त आपला कचकडी डामडौल आणि तामझाम सांभाळण्यात व्यस्त राहिले. तुमी मात्र स्वस्थ बसला नाय. आपल्या तुटपुंज्या अधिकारांचा उपयोग करून तुमी प्रजेच्या कल्याणासाठी झटत राहिलात. सामाजिक सुधारणांना आधी प्राधान्य दिलंत! दबलेल्या, पिचलेल्या घटकांना मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे वळखून शाळा काढल्या. निरनिराळ्या जातीतील विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहं उभी केली. मागास जातींना नोकरीत 50 टक्के जागा राखीव ठेवल्या. अगदी स्वराज्यातल्या वकिलीच्या सनदा महार, मांग, चांभार इत्यादी लोकांना दिल्या. पुनर्विवाह आणि आंतरजातीय विवाहास मान्यता देणारे कायदं तुमी केलं. कुलकर्णी वतने बंद करून तलाठी पद्धत सुरु केली. एवढंच नाय तर तलाठी म्हणून नेमणूक करताना अस्पृश्याला प्राधान्य दिलंत. गुन्हेगारी जमातींची हजेरी पद्धत कायद्यानं बंद केलीत. सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यता पाळली जाऊ नये म्हणून कायदा केलात.

पण राजन... मी तुला खरं सांगणार नाही, पण सांगितल्याशिवाय राहणार नाही!

राजं... आता काळ लय सोकावलाय बघा. गोरगरिबांची पोरं शिकली पाहिजेत म्हणून तुमी लढा उभारलात. रयतेला प्राथमिक शिक्षणाचा थोडा तरी अंश मिळाला पाहिजे, ही तुमची तळमळ होती. पण राजं, आज शिक्षण क्षेत्राचं चित्र लय विचित्र होऊन बसलय, शिक्षणाचं खाजगीकरण झाल्यामुळ जिकडं तिकडं शिक्षण संस्थांचा सुळसुळाट वाढलाय. शिक्षणाचा निस्ता बाजार मांडलाय. शेतकऱ्यांकडून माल घेऊन व्यापारी जसा चढ्या दरान विकून नफा कमावतो, तसंच शिक्षण क्षेत्रात पण घडतंय. फुले-शाहू-आंबेडकर आणि अलीकडील काळात कर्मवीर भाऊरव पाटील, स्वामी रामानंद तीर्थ, पंजाबराव देशमुख यांच्या प्रयत्नांमुळे बहुजन समाजासाठी उघडलेली शिक्षणाची दारं पुन्हा बंद होऊ लागलीत. राजं, तुमी गोरगरिबांना शिक्षण मिळावं म्हणून लढलात. पण, आज पैसा कमावण्यासाठी शाळा उघडल्या जातायत. शाळा चालवणारे स्वतःला सम्राट म्हणवून घेतायत. तुमी म्हणाला होतात की, 'शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही." पण राजं, शिक्षण घेणं एवढं सोप्पं राहिलं नाय आता. जग लय बदललंय. हितं पैशाबिगर पान बी हलत नाय. सोन्याच्या भावानं इकलं जातंय शिक्षण! शाळा प्रवेश म्हटलं की पालकांच्या पोटात गोळा येतोय. हितं गोरगरिबांच्या पोटाला दोन वेळचं नीट अन्न मिळत नाय, ते शिकायला पैसा कुटून आणणार राजं? देशाची लोकसंख्या 140 कोटींवर पोचलीय. तरुणांचा देश म्हणून आपला देश ओळखला जातो आख्ख्या जगात; पण टाजं त्या तरुणांना परवडणारं शिक्षण मिळायला पायजे का नको. आवं, दहावीनंतर शिक्षण परवडत नाय म्हणून शाळा सोडून मजुरी करणाऱ्यांची संख्या कोटींच्या घरात आहे. उच्च शिक्षण घ्यायचं तर त्यासाठी नोटा मोजाव्या लागतात. हुशार असून बी शिकायला मिळत नाय म्हणून तरणीताठी पोरं-पोरी जीव देत्यात. ज्यांच्याकडे पैसा आहे, त्यांचीच मुलं उच्च शिक्षण घेऊ शकतात. गोरगरिबांच्या पोरांना संधीच मिळत नाही. अशी आजची शिक्षण व्यवस्था बनलीय... खादाड...!


आजवर ढगफुटी शब्द ऐकला होता राजं, पण अलीकडं पेपरफुटी हा एक नवीच प्रकार घडू लागलाय.

भयंकर प्रकार आहे हा. म्हणजे पेपर फुटला की विद्यार्थाचं नशीब पण फुटतंय बघा. मार्कवाढ, पेपरफुटी,

कॉपी असला प्रकार घडला की परीक्षा रद्द केल्या जातात. विद्यार्थ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात जाते. मग

पुन्हा परीक्षा, पुन्हा पेपरफुटी... यातच वय निघून जातं आणि आत्महत्या हा शेवटचा पर्याय निवडावा लागतोय

मुलांना... तोही नाईलाजानं!

कॉलेजपेक्षा खाजगी क्लासचं महत्व वाढत चाललय. त्यांचा हजारो कोटींचा धंदा आणि तरीही देशभरात रोज आत्महत्या करणारे सरासरी 35 विद्यार्थी... ही अवस्था आहे शिक्षण क्षेत्राची!


राजं... तुमचा काळ बरा हुता. गोरगरिबांच्या मागं तुमच्यासारखं लोककल्याणकारी राजं उभं हुतं. तुमी म्हणाल तसं घडत हुतं. आता गरिबांना कुणी वालीच उरला नाय. जो-तो आपल्यापुरतं बघतोय. आपला खिसा भरतोय. गोरगरिबांना कवडीची किंमत राहिली नाय. कडीपत्त्यासारखा वापर करून त्यांना फेकून दिलं जातंय.


शिक्षण नाय म्हणून काम नाय. काम नाय म्हणून खिशात पैका नाय. पैका नाय म्हणून उन्नती नाय. राजं.... देश चंद्रावर, मंगळावर गेला पण गोरगरिबांच्या झोपडीची वाट शासनाला अजून पण सापडना. भाकरीच्या चंद्रासाठी लोक मर मर मारतायत. तरीही पोटाची खळगी भरत न्हाईत. देशात गुन्हेगारी वाढलीय, असं फक्त बोललं जातं, पण ती कशामुळ वाढली याचा शोध मात्र कुणी घेत नाय. मिडीयाच्या कॅमेयाला राजकारण्यांच्या, श्रीमंतांच्या, नट-नट्यांच्या घरात काय चाललय हे बरोब्बर दिसतं पण गोरगरिबांच्या झोपडीतला अंधार दिसत नाय. हितं तरुण पिढीचं आयुष्य उज्ज्वल नाय तर अंधकारमय होत चाललंय.


सर्वांना शिक्षणाची समान संधी आणि परवडणारं शिक्षण मिळालं तर आपला देश प्रगतीच्या शिखरावर पोचेल. भारत महासत्ता होण्याचं स्वप्न उच्चशिक्षित तरुणपिढीच पूर्ण करु शकते. अज्ञानात बुडून गेलेल्या देशात उत्तम मुत्सद्दी व लढवय्ये वीर कधीही निपजणार नाहीत... हे या राजकारण्यासनी कधी ओ कळणार?


राजं... आज देशात शिक्षणविषयक धोरणाबाबत कमालीची अनास्था वाढलीय. अहो, मोफत व सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा अस्तित्वात येण्यासाठी 2010 उजाडावे लागले. ज्या देशात राष्ट्रीय उत्पन्नाच्या जेमतेम चार टक्के खर्च शिक्षणावर केला जातो, त्या देशाचे भविष्य काय असेल, तुम्हीच सांगा राजं. निस्ता अभ्यासक्रम बदलून बदल घडणार नाय. शिक्षणाची गंगा तळागाळातील समाजघटकापर्यंत पोचली पाहिजे. शिक्षणाची मक्तेदारी मोडून काढावी लागेल... जशी तुमी काढली होती.


राजं... शिक्षण क्षेत्राला आलेली अवकळा घालवायला लय काम करावं लागणार बगा. तरास तर सोसावाच लागणार हाय सगळ्यांना. त्याबिगार शिक्षणाचं झाड मूळ धरणार नाय. तुमाला बी तरास झाला हुताच की. समदं माहिती हाय मला. पण तुमी नमला न्हाय. हाती घेतलेलं कार्य तडीस नेलं. आता पुन्हा एकदा शिक्षणाच्या रुपानं याच मातीत असलेलं न्याय, समता, बंधुता आणि माणुसकीचं लेणं ह्या आपल्या मातीला पुन्यांदा मिळवून द्यायचंय बगा!


या मातीला साक्षी धरुन आणि तुमच्या स्मृतींना अभिवादन करून ही आन घेते आणि थांबते..!