Advertisement
मुंबई : 'I, Nilesh Dnyandev Lanke Having Being Elected A Member Of House Of People... अशी अस्सल इंग्रजीमध्ये खासदारकीची शपथ घेत अहमदनगरचे शरद पवार गटाचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंकेंनी सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. 18 व्या लोकसभेमध्ये निवडून गेलेल्या खासदारांचा शपथविधी कालपासून सुरु आहे. देशात तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार आल्यानंतरच हे पहिलेच अधिवेशन असून नियमाप्रमाणे पहिल्या अधिवेशनामध्ये सर्व नवनर्वाचित खासदारांना शपथ दिली जाते. यानुसार आज शरद पवार गटाच्या खासदारांना शपथ घेण्यात आली. विशेष म्हणजे निलेश लंकेंनी थेट इंग्रजीमध्ये शपथ घेतली. अहमदनगरचे माजी खासदार आणि निलेश लंकेंविरुद्ध लोकसभा निवडणूक लढवलेले खासदार सुजय विखे-पाटील यांनी निलेश लंकेंना संसदेत जाऊन इंग्रजी तरी बोलता येईल का अशी टीका केली होती. मात्र, याच टीकेला थेट शपथ घेण्यापासूनच निलेश लंकेंनी जसेच्या तसे उत्तर दिल्याची चर्चा सध्या आहे.
अहमदनगर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, माजी खासदार सुजय विखे यांनी निलेश लंके यांच्यावर वेगवेगळ्या मुद्द्यावरुन निशाणा साधला होता. एका भाषणात तर लंकेच्या शिक्षणावरूनही सुजय विखे-पाटील यांनी टीका केली होती. “निलेश लंकेंनी माझ्यासारखं इंग्रजी बोलून दाखवल्यास मी निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरणार नाही”, असं आव्हानही सुजय विखे पाटील यांनी दिलेलं. लंके यांनी प्रचारकळात विखेंच्या टीकेला उत्तर दिलेलं. अहमदनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शरद पवार गटाचे उमेदवार म्हणून निलेश लंके यांनी भाजपाच्या उमेदवार सुजय विखे पाटलांचा 28 हजार मतांनी धुव्वा उडवला. विजयानंतरही लंकेंनी अनेक ठिकाणी इंग्रजीमधूनच संसदेत भाषण करणार, प्रश्न विचारणार असं म्हटलं होतं. आज लंकेंनी इंग्रजीतून शपथ घेऊन आपल्या खासदारकीच्या कारकिर्दीची सुरुवातच इंग्रजीत केली आहे.
