#

Advertisement

Friday, June 7, 2024, June 07, 2024 WIB
Last Updated 2024-06-07T11:22:40Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

'लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद...' !

Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट 

मुंबई : लोकसभा निवडणुकीला महाराष्ट्रात काही मतदारसंघांमध्ये भावनिक किनार असल्याचं पाहायला मिळालं. बारामतीत राजकारणामुळं एकाच कुटुंबात राजकीय फूट पडल्याचं दिसून आलं.  बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे विजयी झाल्या आणि त्यांनी राष्ट्रवादीच्याच अजित पवार गटाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पराभूत केलं. 
निवडणुकीआधी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर बारामतीतही मोठं सत्ताकारण रंगल्याचं पाहायला मिळालं. विश्वासाच्या माणसांनी शरद पवारांची साथ सोडली, पण, त्यांच्या या 'संसदरत्न' लेकिनं जनसामान्यांचा विश्वास जिंकण्यात सातत्य दाखवलं आणि बारामतीचा हक्काचा गड राखला. सुप्रिया सुळे यांच्या या विजयाला काहीशी भावनिक किनार होती आणि त्यांनी शेअर केलेल्या पोस्टमधून हे स्पष्ट झालं.
लोकसभा निवडणुकीचा निकाल हाती आल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून एक फारच बोलका फोटो शेअर केला. जिथं त्यांच्या कपाळी विजयाचा गुलाल पाहायला मिळाला.
'श्रमलेल्या बापासाठी, लेक नारळाचं पाणी;
लढणाऱ्या लेकीसाठी, बाप बुलंद कहाणी!!'
असं कॅप्शन लिहित शेअर केलेल्या या फोटोमध्ये वडील शरद पवार, आई, प्रतिभा पवार आणि सुप्रिया सुळे यांचं कुटुंब पाहायला मिळालं. लेकिनं मिळवलेल्या या विजयाचा प्रचंड आनंद पाहायला मिळाला. पण, या आनंदात मतदारांनी दाखवलेल्या विश्वासाबद्लचा दिलासा स्पष्टपणे दिसत होता. सुप्रिया सुळे यांच्या कुटुंबातील प्रत्येत सदस्यासाठी हा विजय महत्त्वाचा होता आणि यामध्ये त्यांना रोहित पवार यांनीसुद्धा अतिशय मोलाची साथ दिली.