Advertisement
काँग्रेस पक्षाकडून कारवाई अटळ
मुंबई : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या कोणत्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केलं याबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोल यांच्यासह काही महत्त्वाच्या नेत्यांनी या आमदारांची दिल्लीतील पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर आता कारवाई अटळ आहे. या आमदारांना विधानसभेत काँग्रेसकडून उमेदवारी दिली जाणार नसल्याची चर्चा आहे.
या दरम्यान काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत अतिशय महत्त्वाची बैठक पार पडली आहे. महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या सर्व जिल्ह्याध्यक्षांची बैठक दादर येथील टिळक भवन येथे पार पडली. या बैठकीला काँग्रेस पक्षाचे महासचिव केसी वेणुगोपाल आणि महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि इतर काँग्रेसचे नेते उपस्थित होते. या बैठकीत नेमकी काय-काय चर्चा झाली, याबाबतची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.
काँग्रेसच्या बैठकीत या मुद्यावर चर्चा झाली
- काँग्रेसच्या आजच्या बैठकीत राज्य सरकारने ज्या काही शासकीय योजना आणल्या आहेत त्याला कसं प्रतिउत्तर देण्यात येणार यासंदर्भात चर्चा झाली. तेलंगणा आणि कर्नाटकमध्ये काँग्रेस पक्षासाठी जी थिंक टँक काम करत आहे, त्यांच्याकडून या शासकीय योजनांना कसं प्रत्युत्तर देण्यात येणार यासंदर्भातील मार्गदर्शन घेण्यात आलं.
- काँग्रेस पक्षाकडून राज्य सरकारने ज्या काही शासकीय योजना काढण्यात आल्या आहेत त्यासंदर्भातील धसका घेण्यात आला आहे. कारण मध्य प्रदेशमध्ये भाजप सरकारकडून एक लाडली बहीण योजना सुरु करण्यात आली होती आणि त्यामुळे काँग्रेस पक्षाला लोकसभेत सपाटून मार खावा लागला होता.
- या बैठकीत आगामी काळात काँग्रेस पक्षाची निवडणुकीत काय रणनिती असेल यासंदर्भात चर्चा झाली आहे.
- काँग्रेसकडून सर्वाधिक विधानसभेच्या जागांवर महाविकास आघाडीमध्ये दावा करण्यात येणार, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे.
- विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवर पक्षश्रेष्ठींकडून कारवाई करण्यात येणार आहे. क्रॉस व्होटिंग करणाऱ्या आमदारांवरील कारवाईच्या संदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. पण केसी वेणुगोपाल यांनी हा निर्णय दिल्लीतून आम्ही घेऊ, असा निर्णय या बैठकीत घेतला.
