Advertisement
पिंपरी चिंचवड 14 नगरसेवक साथ सोडणार
मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवार बॅकफूटवर गेल्याचं पाहायला मिळत आहे. राजकारणात एकदा म्होरक्या बॅकफूटला गेला की सहकारीही टीम बदलायच्या तयारीत असतात. तशीच अवस्था अजित पवारांची झाली आहे. कारण पिंपरी-चिंचवडमधील तब्बल 14 नगरसेवक अजित पवारांचा गट सोडून मोठ्या पवारांकडे जाण्याची शक्यता आहे.
बारामती नंतर पिंपरी चिंचवड हा अजित पवार यांचा बालेकिल्ला. पिंपरी-चिंचवड महापालिकेवर तब्बल 15 वर्ष राष्ट्रवादीने सत्ता गाजवली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर 36 पैकी एक नगरसेवक शरद पवारांकडे राहिला. उर्वरित 35 नगरसेवकांनी अजित पवारांसोबत जाणं पसंत केलं. मात्र लोकसभा निकालानंतर आता अजित पवारांना इथं धक्का बसण्याची शक्यताय. अजित पवारांचे कट्टर समर्थक अजित गव्हाणेंसह चौदा नगरसेवकांनी शरद पवारांची भेट घेतल्यानं खळबळ उडालीय. नगरसेवकांच्या भेटीनंतर मोठ्या पवारांनीही प्रवेशासाठी पक्षाचे दरवाजे उघडे असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. मोठ्या पवारांची भेट घेतलेल्या चौदा नगरसेवकांसोबतच अजित पवार गटाचे सर्वच नगरसेवक शरद पवार गटात येण्यास इच्छुक असल्याचा दावा शरद पवार गटाच्या तुषार कामठे यांनी केला आहे.
