Advertisement
सोलापूर : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष बांधणी आणि विधानसभेला इच्छुक याची माहिती जाणून घेण्यासाठी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत. सोलापुरातील 11 विधानसभा मतदारसंघात शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या समोर आपण इच्छुक असल्याचे सांगितले तर दुसरीकडे जयंत पाटलांचा संवाद मेळावा होत असतानाच जिल्ह्याच्या काही पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा इशारा यामुळे एकच खळबळ उडाली आहे. आम्हाला मोठ्या पदाची अपेक्षा असणे गैर आहे का? कालपरवा आलेल्यांना, ज्यांना पक्षाचा कोणता गंध नाही अशांना जर मोठी पद दिली जात असतील तर आम्ही पक्षात थांबायचे का? असा प्रश्न उपस्थित करत जयंत पाटील यांनी लक्ष घालावे अन्यथा आम्हाला पक्ष सोडावा लागेल असा इशारा जिल्हा सरचिटणीस महेश माने यांनी दिला आहे.
