Advertisement
सोलापूर : सोलापुरच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत सातत्याने चर्चेत असलेले नाव म्हणजे अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे. माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या असलेल्या अॅड. कोमलताई यांचे नाव सोलापूर लोकसभेसाठी भाजपच्या संभाव्या यादीत अग्रस्थानी होते. परंतु, पुरूष उमेदवारी देण्याच्या निर्णयामुळे सोलापुरचा निकाल लागायचा तो लागला आहे. आता, विधानसभेसाठी अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे इच्छुक आहेत का? असा प्रश्न उपस्थित होत असताना त्यांना अन्य पक्षांकडूनही ऑफर आल्याची चर्चा आहे. याबाबत अधिकृत अशी माहिती मात्र उपलब्ध होत नसल्याने याबाबत लक्ष्मणराव ढोबळे यांचा काय निर्णय असणार याकडे लक्ष असणार आहे.
‘भावी आमदार’ म्हणूनही अनेकांनी शिक्का मोर्तब केलेल्या अॅड. कोमलताई या भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार असतील, अशी चर्चा होत असताना नेहमी प्रमाणे अन्य नावे समोर येत आहेत. राज्यातील प्रमुख राजकीय पक्षांसह अन्य छोट्या पक्षांकडून त्यांच्या चिन्हावर सोलापुरात निवडणूक लढविण्याच्या ‘ऑफर’ अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांना गेल्याचे समजते. परंतु, याबाबत अधिकृत दुजोरा मिळत नाही.
अॅड. कोमलताई यांचे वडील माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे हे भाजपचे नेते आहेत. त्यामुळे अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे या इतर पक्षांकडून उमेदवारी स्विकारणार का? अशीही चर्चा आहे.
भाजपचे नेते माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या अॅड. कोमलताई यांनी गेल्या काही वर्षांत बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून स्वत:चे स्वतंत्र राजकीय स्थान निर्माण केले आहे. वडील लक्ष्मणराव ढोबळे हे भाजपचे नेते असले तरी अॅड. कोमलताई यांनी बहुजन रयत परिषदेचे कार्य राजकीय नव्हे तर सामाजिक दृष्टीने जोमाने सुरू ठेवले आहे. त्यामुळे एक सक्षम नेतृत्त्व म्हणून त्यांची जनमाणसांत चांगली प्रतिमा आहे. ‘भाजप आमची आणि आम्ही भाजपचे’, अशा भूमिकेत लक्ष्मणराव ढोबळे कार्यरत असले तरी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी आपल्या समाज बांधवांसाठी मोठे कार्य केले आहे किंबहुना याच परिषदेद्वारे त्यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांची भक्कम फळी तयार केली आहे. राज्यातील कानाकोपर्यासह सोलापुरात बहुजन रयत परिषदेची स्वत:ची ताकद आहे. त्यामुळे राज्यातील कोणत्याही मतदार संघातून निवडणूक लढविणे हे अॅड. कोमलताई यांना सोपे जावू शकते विशेष म्हणजे अॅड. कोमलताई साळुंंखे यांच्याकडे भाजपसह अन्य राजकीय पक्षही ‘विनींग सिट’च्या उमेदवार म्हणून पाहतात. परंतु, सध्या तरी अॅड. कोमलताई यांनीउ विधानसभेबाबत कोणतीही भूमिका घेतली नसल्याचे स्पष्ट आहे.
