#

Advertisement

Tuesday, July 30, 2024, July 30, 2024 WIB
Last Updated 2024-07-30T13:11:36Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली

Advertisement

राज ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर कार्यकर्ते आक्रमक 
अकोला : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासंदर्भात केलेल्या वक्तव्यानंतर मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांची गाडी फोडली आहे. मनसे कार्यकर्ते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याने काही वेळासाठी वातावरण तापलं होतं. दरम्यान, अमोल मिटकरी यांनी यावर व्यक्त होताना आपण अशा धमक्यांना भीक घालत नाही असं म्हटलं आहे. अमोल मिटकरी अकोला शहरातील विश्रामगृहात आले असता मनसैनिकांनी त्यांचा पाठलाग केला आणि दरवाजाला लाथ मारून आत प्रवेश केला. यावेळी अमोल मिटकरी यांच्या समर्थकांसोबत मनसैनिकांची बाचाबाची झाली. यामुळे तणाव निर्माण झाला होता. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. यानंतर अमोल मिटकरी यांच्या गाडीची तोडफोड सुद्धा करण्यात आली. 

मिटकरीं यांनी काय टीका केली ?
दिलेला शब्द पाळणाऱ्या अजित पवारांबद्दल सुपारीबहाद्दरांनी बोलू नये. कारण या सुपारीबहाद्दरांचं टोलनाक्याचं, भोंग्याचं किंवा इतर कोणतंही आंदोलन यशस्वी झालं नाही. या व्यक्तीची विश्वासार्हता संपली आहे. महाराष्ट्राच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात अयशस्वी ठरलेल्या व्यक्तीने अजित पवारांच्या कार्यकर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणं म्हणजे हे सूर्याला वाकुल्या दाखवण्यासारखं आहे," अशी टीका अमोल मिटकरी यांनी केली. सुपारीबहाद्दर नेत्यांकडून जनतेने योग्य तो धडा घेतला आहे. नव्या नवरीचे नऊ दिवस म्हणून पुण्यात भेट द्यायची. ज्या व्यक्तीला NDRF चा लाँग फॉर्म माहित नाही, तो माणूस आज आपत्ती व्यवस्थापनावर बोलतो हा अलीकडच्या काळातील राजकारणातील सर्वात मोठा जोक आहे अशी खिल्लीही त्यांनी उडवली आहे.