Advertisement
मुंबई : पराभव होऊनही पंकजा मुंडेंना लॉटरी लागली आहे. पंकजा मुंडे आमदार होणार आहेत. इतकच नही तर त्यांना मंत्रीपदीही मिळणार आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडेंची लवकरच विधानपरिषदेवर वर्णी लागत आहे. पंकजा मुंडे यांचा मंत्रिमंडळातही समावेश केला जाणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभेपाठोपाठ लोकसभा निवडणुकीतही पंकजा मुंडेंना दारूण पराभव पत्करावा लागला. मात्र, आता पंकजा मुंडे समर्थकांसाठी भाजपच्या गोटातून आनंदाची बातमी लवकरच येणार आहे. पंकजा मुंडेंना विधानपरिषदेवर पाठवून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्लॅन भाजपनं आखल्याची चर्चा आहे. आगामी विधानसभा निवडणुकीआधी ओबीसी मतांची बेगमी करण्यासाठी पंकजा मुंडेंचा मंत्रिमंडळातही समावेश केला जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समजत आहे.
पंकजा मुंडेंचं पुनर्वसन होणार?
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये पंकजा मुंडे महिला आणि बालविकास मंत्री होत्या. परळी विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंनी त्यांना हरवलं. तर, बीड लोकसभा मतदारसंघात बजरंग सोनावणेंनी त्यांचा दारूण पराभव केला. ओबीसी-मराठा वादाचा फटका त्यांना बसल्याचं मानलं जातंय. पंकजा मुंडेंना मानणारा मोठा ओबीसी वर्ग महाराष्ट्रात आहे. पंकजा मुंडेंना मंत्रीपद दिल्यास ओबीसी मतं पक्षाकडं वळतील, असं भाजपला वाटतं.
