#

Advertisement

Monday, July 22, 2024, July 22, 2024 WIB
Last Updated 2024-07-22T11:32:35Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

"त्या" शंभर कोटी निधीचे झाले काय?

Advertisement

अ‍ॅड. कोमलाताई साळुंखे-ढोबळे यांचा पत्रकार परिषदेत सवाल

  • अण्णा भाऊ साठे जन्मशताब्दी वर्षं : सरकारचे मातंग समाजाकडे दुर्लक्ष 

अमरावती : साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित विविध कार्यक्रमांच्या नियोजनाकरिता 2019 साली तत्कालीन शासनाने 100 कोटींचा निधी दिला होता. मात्र, कोरोना महामारीमुळे कोणतेच कार्यक्रम किंवा कामे झाली नाहीत. मग, तो शंभर कोटींचा निधी गेला कुठे? असा प्रश्न बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. कोमलाताई साळुंखे-ढोबळे यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला आहे.
बहुजन रयत परिषदेचा विभागीय कार्यकर्ता संवाद मेळावा अमरावती येथे झाला, त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
अ‍ॅड. कोमलाताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, अण्णा भाऊंची कर्मभूमी असलेल्या मुंबईत त्यांचे राष्ट्रीय स्मारक उभारणे, साहित्यविषयक कार्यक्रम आयोजित करणे, वाटेगाव येथे स्मारक उभारणे, अण्णा भाऊ साठे यांच्या चित्ररथाचे महाराष्ट्रभर प्रदर्शन करणे, जन्मशताब्दी गौरवग्रंथ प्रकाशित करणे, अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्यावर आधारित चर्चासत्र व परिसंवाद आयोजित करणे, मातंग समाजातील 100 तरुण उद्योजकांना एमआयडीसीमध्ये भूखंड उपलब्ध करून देणे, 100 सामाजिक कार्यकर्ते, कलावंत यांना समाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करणे अशा विविध कार्यक्रमांसाठी शासनाने 100 कोटींचा निधी जाहीर केला होता. कोरोनामुळे 2019 ते 2020 या वर्षभरात कोणतेच कार्यक्रम झाले नाहीत मग त्या निधीचे काय केले, याचे उत्तर शासनाने द्यावे.
1. शिवाय महायुती सरकारने बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली आहे. यासाठी प्रत्येक वर्षी 105 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मातंग समाजाच्या विद्यार्थांना विविध स्पर्धा परीक्षा शैक्षणिक सुविधा, देशातील नामांकित संस्थेत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे मातंग समाजातील मुलांचे शिक्षण व नोकरीतील प्रमाण वाढणार आहे, असे सरकार म्हणत असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा मात्र मिळत नाही.

2. पुणे संगमवाडी येथे क्रांतिवीर लहूजी साळवे स्मारकासाठी 101 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. एकूण 400 कोटी रुपयांच्या स्मारकाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. पण पुढे काय? स्मारकाची एक वीटही अजून रचली नाही. 

3. वाटेगाव येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रुपये वितरीत करून भूसंपादनासाठी आर्थिक तरतूद केली आहे, असे सांगतात. ती कुठे गेली?

4. क्रांतिवीर लहूज साळवे अभ्यास आयोगाच्या 68 शिफारशींपैकी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील 19 शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकवर्षी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पण तीही फक्त कागदावरच!

5. रमाई घरकुल योजने अंतर्गत स्वतंत्र घरकुल योजना मातंग समाजाला देण्याचा निर्णय घेतला आहे. किती जणांना घरकुलं मिळाली?

6. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर अनुसूचित जातींचा अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकारी समिती नेमली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही समिती नेमली आहे. ती समिती कुठे आहे? त्या समितीने आजपर्यंत काय अभ्यास केला? कोणते निर्णय घेतले? त्याचा आढावा शासनाने जाहीर करावा. 

असे अनेक प्रश्न आहेत, ज्याचा आढावा बहुजन रयत परिषद या विभागीय दौर्‍यात घेणार आहे आणि शासनदरबारी पाठपुरावा करणार आहे.
अ‍ॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे म्हणाल्या की, सध्या राज्यात सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी राजकीय पक्षांचा जो काही आटापिटा चालला आहे, त्यामुळे सर्वसामान्य जनता संभ्रमात आहे. आपण थोडा बारकाईने विचार केला तर लक्षात येईल की, सगळ्या गोष्टी कॉम्पॅक्ट होत चालल्या आहेत. शासनाने अनेक गोष्टी कॉम्पॅक्ट करून त्या जनतेवर जबरदस्तीने लादल्या. पण जातीचं काय? आरक्षणाचं काय? सांगायचा उद्देश हाच की, शासन दरबारी मागण्या मान्य करून घेण्यासाठी व्यापक जनआंदोलन उभे करावे लागते. ते मराठा समाजाने केले आहे. मात्र छोट्या छोट्या समाज घटकांनी फक्त बघ्याची भूमिका घेऊन चालणार नाही. आपल्यालाही जनआंदोलन उभारावे लागेल. यासाठी बारा बलुतेदारांना एकत्र यावे लागतील. यासाठी कुणीतरी पुढाकार घेऊन वंचित बहुजन समाजाला एका छताखाली आणावे लागेल. हेच काम बहुजन रयत परिषद संघटना करत असल्याचेही अ‍ॅड. कोमलताई यांनी स्पष्ट केले.