Advertisement
मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांची आज सह्याद्री अतिथीगृह येथे भेट झाली. या बैठकीत काही राजकीय चर्चा झाली का? याबाबतची माहिती अद्याप समजू शकलेली नाही. दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 20 मिनिटे चर्चा झाली. या बैठकीतली औपचारिक चर्चेविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
राज्यात मराठा आहरक्षणावरुन वातावरण तापलं आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारला इशारा दिला आहे. याच मुद्द्यावरुन शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज मुंबईत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक पार पडली. या बैठकीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मार्ग काढण्यासाठी चर्चा झाली. मराठा-ओबीसी आरक्षणाच्या वादावर शरद पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात 20 मिनिटे बंद दाराआड चर्चा झाली. मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना सरकारने जे आश्वासन दिलं होतं, याबाबत चर्चा नसल्याने विरोधी पक्षात नाराजी होती. पण आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात जातीय तेढ निर्माण होऊ नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांनी चर्चा केली. आगामी काही दिवसात पुन्हा सर्वपक्षीय बैठकीचं निमंत्रण विरोधकांनाही देणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी शरद पवारांना आश्वासन दिलं. याचाच अर्थ आता सरकार पुन्हा या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची शक्यता आहे.
