Advertisement
मुंबई : गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला प्रवीण तरडे दिग्दर्शित ‘धर्मवीर 2’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. या ट्रेलर लाँच सोहळ्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक राजकीय नेते आणि सिनेसृष्टीतील कलाकार उपस्थित होते. ‘धर्मवीर 2’ हा चित्रपट एकनाथ शिंदे यांचे बंड आणि धर्मवीर आनंद दिघेंच्या मृत्यूचे गूढ यावर आधारित असल्याची चर्चा सध्या पाहायला मिळत आहे. आता यावरुन आनंद दिघे यांचे पुतणे केदार दिघे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला आहे.
“गेल्या अडीच वर्षाच्या काळात एकनाथ शिंदेंनीच आनंद दिघेंचा मृत्यू कशामुळे झाला, याची माहिती दिली होती. तो हार्टअटॅकमुळे झाला, असं त्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. मग आता निवडणुकीपूर्वी किंवा काही महिन्यांपासून तुमचे नेते दिघे साहेबांच्या मृत्यूचं गूढ आम्ही बाहेर काढू, असं सांगत आहेत, याचा अर्थ नेमका काय? असा प्रश्न केदार दिघे यांनी उपस्थित केला आहे. याचाच अर्थ तुम्ही स्वत:च्या स्वार्थासाठी 22 वर्ष साहेबांच्या मृत्यूचं राजकारण करत राहणार का? तुमच्या या दैवतावर, तुम्हाला ज्याने घडवलं अशा नेत्यावर जेव्हा अन्याय होत होता, तेव्हा तुम्ही गेल्या 22 वर्षांपासून गप्प का बसलात? असेही केदार दिघेंनी म्हटले आहे.
