Advertisement
मुंबई : महाविकास आघाडीतील दोन पक्षांच अखेर ठरलं आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षांमध्ये जागावाटपाचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता प्रतीक्षा काँग्रेस पक्षाची उरली आहे. काँग्रेस किती जागा लढवणार आणि ठाकरे, पवार गटाचं सूत्र मान्य करणार का? हे पाहावं लागणार आहे. महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष 95 ते 100 जागा लढण्याची शक्यता आहे. तसेच विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला जाणार नाही. निकालानंतरच मुख्यमंत्रीपद जाहीर केले जाणार असल्याचं सांगण्यात आलं.
दरम्यान, आम्ही 288 जागांचा ॲक्सेसमेंट करत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेस देखील 288 जागांवर चाचपणी करत आहे आणि काँग्रेस पक्ष सुद्धा 288 जागांचा अभ्यास करत आहे. तिघांचाही हा अभ्यास पूर्ण झाल्यावर आम्ही तिघे एकत्र बसू आणि त्यानंतर आम्ही ठरवू, की कोणी कुठे किती जागा लढवायच्या. जो जिंकेल त्यालाच ती जागा मिळेल, असं आमचं सूत्र आहे. लोकसभेलाही हेच सूत्र होतं, असं संजय राऊत यांनी सांगितलं.
काँग्रेस ॲक्शन मोडवर
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर काँग्रेस ॲक्शन मोडवर आली आहे. निरिक्षकांकडून प्रत्येक जिल्ह्यातील विधानसभानिहाय आढावा घेण्यात आला. पूर्व विदर्भातील 99 टक्के जागा लढण्यावर या बैठकीत एकमत झालं. पूर्व विदर्भात काँग्रेसची सर्वात जास्त ताकद आहे. त्यामुळे आमचा वाटा मोठा असला पाहिजे. आम्ही हा अहवाल वरिष्ठांना देणार आहोत, असं अभिजीत वंजारी यांनी सांगितलं. पूर्व विदर्भातील नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गडचीरोली, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील विधानसभेचा यावेळी आढावा घेण्यात आला.
