Advertisement
‘आमचा स्वाभिमान आमचे विमान’, इंदापुरात बॅनर झळकले
इंदापूर : राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत असल्याचे संकेत मिळत आहेत. या जागेवरुन महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता आहे. कारण या जागेवर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांचा दावा आहे. पण इथे अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे विद्यमान आमदार आहेत. पण त्याआधी हर्षवर्धन पाटील यांच्याकडून अपक्ष लढण्याचे संकेत देण्यात येत आहेत का? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. या चर्चा रंगण्यामागील कारणही तसंच आहे. कारण इंदापुरात विमानाचा फोटो असलेला बॅनर झळकला आहे.
भाजपचे इंदापुरातील दिग्गज नेते हर्षवर्धन पाटील हे आगामी विधानसभा निवडणुकीत अपक्ष निवडणूक लढवण्याच्या तयारीत तर नाही ना? असा प्रश्न निर्माण होत आहे. असा प्रश्न निर्माण होण्यामागील किंवा अशी चर्चा सुरु होण्यास इंदापुरातील एक बॅनर कारणीभूत ठरलं आहे.
इंदापूर शहरात एक बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. कारण या बॅनरवर विमानाचा फोटो आहे. तसेच या बॅनरवर लिहिण्यात आलेल्या गोष्टी पाहता इथे आगामी काळात मोठ्या राजकीय उलथापालथीच्या घटना घडू शकतात, याचे संकेत मिळताना दिसत आहेत. इंदापुरात आमचा स्वाभिमान आमचे विमान अशा आशयाचे गुलाल उधळलेले बॅनर झळकवण्यात आले आहेत. आमचं आता ठरले. लागा तयारीला, विधानसभा 2024 असं या बॅनरमध्ये म्हटलं आहे.
