Advertisement
बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे परखड मत
लातूर : मराठा समाजाने आरक्षणासाठी आजवर मोठमोठी आंदोलने केली. लाखोंच्या संख्येने मराठा बांधव रस्त्यावर उतरला, त्यामुळे सरकारला त्यांची दखल घ्यावी लागली. त्याचप्रमाणे बहुजन समाजाला, बारा बलुतेदारांना देखील एकत्र येऊन आपल्या हक्कांसाठी जनआंदोलन उभारावे लागेल, संघर्ष केल्याशिवाय काहीच मिळत नाही. राजकीय पक्ष तुकड्या तुकड्यात वाटला जात असून मतदारांचाच बळी घेत आहे, असे स्पष्ट मत बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केले.
लातूर येथील मयूर हॉटेलच्या सभागृहामध्ये पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, बहुजन रयत परिषदेच्या वतीने विभागीय स्तरावर कार्यकर्ता अभियान राबवणार आहे. शासनाने आजवर मातंग समाजाची मोठ्या प्रमाणात फसवणूकच केली आहे. महाराष्ट्रात एकूण 5 लोकसभा मतदार संघ आणि 29 विधानसभा मतदार संघ अनुसूचित जातीसाठी आरक्षित आहेत. तरीही विकासाच्या बाबतीत ओरडच आहे. मग, लोकप्रतिनिधी करतात काय? फक्तः सत्ता मिळविण्यासाठी विकासाचे गाजर दाखवून मतदारांचा बळी देणे, हे कोणत्याही समाजासाठी घातक आहे, असे परखड मत अॅड. कोमलताई यांनी मांडले. या पत्रकार परिषद वेळी प्रदेश कार्याध्यक्ष श्रीमंत गायकवाड, प्रदेश सरचिटणीस ईश्वर शिरसागर, मराठवाडा अध्यक्ष राजू कसबे, दीपक चाबुकस्वार अशोक जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी सरकारला विचारलेले सवाल :
- 1) साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त 2019 मध्ये तत्कालीन शासनाने 100 कोटींचा निधी जाहीर केला होता. कोरोनामुळे जयंती उत्सव झालाच नाही. मग तो निधी गेला कुठे? याबाबत कोगीच काही बोलत नाही.
- 2) महायुती सरकारने बार्टीच्या धर्तीवर अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची निर्मिती केली आहे. यासाठी प्रत्येक वर्षी 105 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. मातंग समाजाच्या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षा शैक्षणिक सुविधा, देशातील नामांकित संस्थेत शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्यामुळे मातंग समाजातील मुलांचे शिक्षण व नोकरीतील प्रमाण वाढणार आहे, असे तरकार म्हणत असले तरी त्याचा प्रत्यक्ष फायदा मात्र मिळत नाही.
- 3) पुणे, संगमवाडी येथे क्रांतिवीर लहुजी साळवे स्मारकासाठी 101 कोटी रुपये उपलब्ध करून दिले. एकूण 400 कोटी रुपयांच्या स्मारकाचे भूमिपूजन देखील करण्यात आले. पण पुढे काय? स्मारकाची एक वीटही अजून रचलेली नाही.
- 4) वातेगाव येथे साहित्यत्न अण्णा भाऊ साठे यांच्या स्मारकासाठी 25 कोटी रूपये वितरीत करून भूसंपादनासाठी आर्थिक तरतूद केली आहे, असे सांगतात. ती कुठे गेली?
- 5) क्रांतीवीर लहून साळवे अभ्यास आयोगाच्या 68 शिफारशींपैकी साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाकडील 19 शिफारशींची अंमलबजावणी करण्यासाठी प्रत्येकवर्षी 500 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. पण तीही फक्त कागदावरच.
- 6) रमाई घरकुल योजने अंतर्गत स्वतंत्र घरकुल योजना मातंग समाजाला देण्याचा निर्णय घेतला आहे. मला सांगा किती जणांना घरकुलं मिळाली?
- 7) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देश पातळीवर अनुसूचित जातींचा अभ्यास करण्यासाठी उच्चाधिकारी समिती नेमली आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रातही समिती नेमली आहे. ती समिती कुठे आहे? त्या समितीने आजपर्यंत काय अभ्यास केला? कोणते निर्णय घेतले? त्याचा आढावा शासनाने जाहीर करावा.
- 8) अनुसूचित जातीमध्ये अ,ब,क,ड वर्गवारी करण्यासाठी मातंग समाज 30 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा करत आहे.
- 9) राज्यांनी प्रस्ताव केंद्र शासनाकडे सादर केला आहे. परंतु, महाराष्ट्र राज्याने अ,ब,क,ड वर्गवारी करण्यासंदर्भात आजपर्यंत केंद्राकडे प्रस्ताव सादर केलेला नाही. तो कधी करणार?
