Advertisement
अमित शाहांसोबत शिंदे, फडणवीस आणि दादांची बैठक
दिल्ली : राज्यातील महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते दिल्लीत असणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे आज रात्री केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत. राज्यातील राजकीय परिस्थिती आणि विधानसभा निवडणुकीतील जागा वाटप या मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा होणार आहे.
आज नियोजन आयोगाची बैठक होती. या बैठकीसाठी कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्लीत आले होते. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसही दिल्लीत पोहोचले आहेत.
अजितदादा गटाला आणि शिंदे गटाला प्रत्येकी 80 हून अधिक जागा हव्या आहेत. त्यामुळे अजितदादा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज अमित शाह यांच्यापुढे आपली ही मागणी ठेवतात का? त्यावर अमित शाह काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. भाजपकडे सध्या 104 आमदार आहेत. अपक्षांची संख्या मिळून हा आकडा मोठा होतो. त्यामुळे भाजपही अधिकाधिक जागा घेऊन विधानसभा निवडणुकीत डाव टाकण्याच्या तयारीत आहे. अशावेळी शिंदे गट आणि अजितदादा गटाने 80 हून अधिक जागांचा हट्ट धरल्यास भाजपची कोंडी होऊ शकते.
