Advertisement
महाविकास आघाडीने केले आवाहन
मुंबई : बदलापूरमध्ये दोन चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्राच्या प्रतिमेला काळीमा फासला गेला आहे. बदलापूरमधील ज्या शाळेत अत्यंत गंभीर आणि मन सुन्न करणारी घटना घडली ती शाळा भाजपा आरएसएसशी (RSS) संबंधीत आहे. या शाळेची बदनामी होऊ नये म्हणून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. शाळेतील सीसीटीव्ही फुटेज गायब आहे, असा आरोप महाविकास आघाडीने केला आहे. या प्रकरणी महाभ्रष्ट युती सरकारविरोधात महाविकास आघाडीने 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली असून जनतेने मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी व्हावे, असं आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे.
बदलापूरच्या अत्याचाराच्या घटनेने राज्यातील महिला मुलींच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या बैठकीत जागावाटपावर होणारी चर्चा रद्द करून राज्यातील महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि महिला सुरक्षेवर चर्चा करण्यात आली.
बदलापूरच्या घटनेत पोलीसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तक्रार दाखल करण्यास गेलेल्या पीडित मुलीच्या आईला तासनसात पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवण्यात आले. पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत, सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोपही मविआने केला आहे.
भाजपा युती सरकार अत्यंत अकार्यक्षम, भ्रष्ट सरकार आहे या सरकारला जागे करण्यासाठी 24 तारखेला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदमध्ये मविआमधील सर्व घटक पक्ष सहभागी होणार आहेत. बदलापुरच्या पीडित कुटुंबाला न्याय देण्यासाठी डॉक्टर, वकील, पालक यांनीही या बंदमध्ये सहभागी होऊन सरकारच्या विरोधात आवाज बुलंद करावा असं आवाहनही मविआने केलं आहे.
