Advertisement
सोलापूर : लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचे पडघम जोरदार वाजू लागलेले असताना सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असलेले आणि लोकसभेला भाजपकडून उमेदवारीसाठी तेवढ्याच दावेदार ठरलेल्या अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांचे नाव सध्या कोठेही येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लोकसभेसाठीच्या दुसर्या क्रमांकाच्या यादीत महिला उमेदवार म्हणून संधी मिळणार असलेल्या अॅड. कोमलताई या विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात तरी नक्की उतरतील असा अंदाज बांधला जात होता. परंतु, मोठ्या राजकीय घडामोडी घडत असताना अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे अद्यापही शांत असल्याने त्यांच्या भूमिकेमुळे राजकीय गुढ वाढले आहे.
भारतीय जनता पक्षाचे राज्य प्रवक्ते तथा माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या कन्या असलेल्या अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी नेहमीच राजकीय पक्षांपासून फारकत घेत आपली स्वतंत्र राजकीय कारकिर्द घडविली आहे. लक्ष्मणराव ढोबळे यांच्यामुळे लोकसभेसाठी सोलापुरातून त्यांचे नाव चर्चेत होते. परंतु, अॅड. कोमलताई यांनी कधीही आपल्या उमेदवारीबाबत उघड प्रतिक्रिया दिली नाही. याउलट बहुजन रयत परिषदेच्या बैठका घेऊन योग्य उमेदवारांना मतदान करा, असा सल्ला दिला होता. परंतु, लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली. सोलापुरातील लोकसभेच्या निकालानंतरही त्यांनी कोणतीही जाहीर प्रतिक्रिया देणे टाळले. त्यानंतर विधानसभेसाठी सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघांवर दावा सांगत अनेकांच्या उड्या पडत असताना या कालावधीत अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी बहुजन रयत परिषदेच्या माध्यमातून राज्याचा दौरा करीत आपले पदाधिकारी आणि कार्यर्त्यांशी संवाद साधला स्थानिक समस्या जाणून घेतल्या या दौर्यातही राज्यातील अनेक राखीव विधानसभा मतदारसंघातून त्यांनी निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली परंतु, अॅड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी याबाबत कुठलीही भूमिका उघडपणे जाहीर केलेली नाही, त्यामुळे त्यांच्याबाबतचे राजकीय गुढ वाढले असल्याची चर्चा आहे.
