Advertisement
खासदार संजय राऊत यांची टीका
मुंबई : सिंधुदुर्गमधील राजकोट किल्ल्यावर उद्धव ठाकरे समर्थक आणि नारायण राणे समर्थक एकमेकांना भिडले. यावेळेस माजी केंद्रीय मंत्री नारायण राणेंनी प्रसारमाध्यमांच्या कॅमेरांसमोर घरात घुसून मारण्याची भाषा केल्याचं चित्रित झालं. तर दुसरीकडे निलेश राणे हे पोलीस अधिकाऱ्यांबरोबर भांडत असल्याचे व्हिडीओही समोर आले. याच विषयावर आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते तसेच खासदार संजय राऊत यांनी कठोर शब्दांमध्ये राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करीत फडणवीसांना लाज वाटली पाहिजे असे म्हटले आहे.
राजकोटवर आलेले असताना खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे आणि निलेश राणे आणि पोलिसांमध्ये झालेल्या बाचाबाचीचा संदर्भ देत टीका केली. आयएनएस विक्रांतची फाइल कोर्टाने उघडली आहे, असा गृहमंत्र्यांचा कारभार आहे. आपण मालवणमध्ये काय पाहिलं? गृहमंत्रालयाला लाज वाटली पाहिजे. त्यांच्या पोलिसांवर त्यांच्या पार्टीचे काही गुंड पोलिसांच्या तोंडावर थुंकले. ज्या पद्धतीने ते पोलीस अधिकाऱ्याला शिव्या देत होते, हा गृहमंत्रालयावर थुंकण्याचा प्रकार झाला. काय केलं गृहमंत्र्यांनी? गृहमंत्र्यांचं काम काय आहे? आपल्या विरोधकांविरुद्ध एफआयआर दाखल करा? त्यांच्याविरुद्ध खोटे खटले दाखल करा? पैसे बनवा एवढेच काम आहे? तुमच्या पोलिसांवर तुमच्या पार्टीचे कार्यकर्ते थुंकतात. तुम्ही काय करता? खासदार संजय राऊत यांनी असे प्रश्न उपस्थित केले.
