Advertisement
पुणे : रक्षा बंधनाच्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्याकडून राखी बांधून घेणार का? असा सवाल राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना करण्यात आला होता. त्यावर मी राज्याच्या दौऱ्यावर आहे. वाटेत ज्या बहिणी भेटतील त्यांच्याकडून राखी बांधून घेईल. तिकडे सुप्रिया असेल तर तिला जाऊन भेटेल आणि राखी बांधेल, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनाही तुम्ही अजितदादांना राखी बांधणार का? असा सवाल करण्यात आला होता. त्यावर सुप्रिया सुळे यांनी जे उत्तर दिलं त्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. त्यामुळे पवार कुटुंबात अजूनही सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे.
तुम्ही अजितदादांना राखी बांधणार आहात का? असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांना करण्यात आला. त्यावर त्यांनी अत्यंत त्रोटक उत्तर दिलं. आपल्या संस्कृतीत आधी लग्न कोंढाण्याचं आहे. आधी काम आणि नंतर काय साजरे करायचं ते करायचं. जे काही असेल ते, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. त्यावर राखी बांधायला जाणार आणि नातं पाळणार, असं अजितदादा म्हणाले आहेत, असं सुप्रिया सुळे यांना सांगितलं असता, रामकृष्ण हरी म्हणत त्यांनी बोलणं टाळलं. त्यांच्या या उत्तराने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. पवार कुटुंबात अजूनही सर्व काही अलबेल नसल्याची चर्चा सुरू आहे.
