Advertisement
सोलापुर : शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात लागलेल्या भाजप नेते चन्नवीर चिट्टे यांच्या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला धक्कादायक पराभवाला सामोरे गेल्यानंतर, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत भाजपला अंतर्गत वादास सामोरे जाण्याची शक्यता असून, चन्नवीर चिट्टे समर्थकांनी शहर उत्तर विधानसभा मतदारसंघात अनेक ठिकाणी “आमचं ठरलय , लक्ष्य शहर उत्तर विधानसभा” असे बॅनर सर्वांचे लक्ष वेधून घेत असून भाजपचे कमळ चिन्ह टाकून बॅनर लागल्याने विद्यमान आमदार विजयकुमार देशमुखांना ही डोकेदुखी ठरणारी आहे. चन्नवीर चिट्टे हे भारतीय जनता पार्टीचे गेल्या ३२ वर्षांपासूनचे जुने, सक्रिय कार्यकर्ते असून, पश्चिम महाराष्ट्रातील भाजपचे पहिले शहर उत्तर विधानसभेचे आमदार स्वर्गीय लिंगराज वल्याळ यांचे स्वीय सहायक होते. त्यावेळी त्यांनी खुप नावलौकिक मिळविला.
