Advertisement
सोलापूर : जिल्ह्यात जागावाटपावरुन महाविकास आघाडीत ठिणगी पडण्याची शक्यता आहे. कारण सोलापूर काँग्रेसकडून सोलापूर जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर दावा करण्यात आला आहे. पुण्यातील बैठकीमध्ये प्रदेशाध्यक्ष आणि प्रभारींसमोर सोलापूर काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडे बैठकीत जिल्ह्यातील विधानसभेच्या 11 पैकी 6 जागांवर देण्याची मागणी केली आहे. शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या या मागणीला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील दुजोरा दिला आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच विधानसभेच्या जागेवर काँग्रेसनं दावा केला आहे. शरद पवार या बाबतीत काय भूमिका घेतात हे महत्वाचं ठरणार आहे.
जागावाटपाबाबत अद्याप निर्णय नाही
दरम्यान, विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागावाटपासंदर्भात महाविकास आघाडीत चर्चा सुरु आहे. अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. जो पक्ष ज्या ठिकाणी निवडून येईल त्या ठिकाणी त्या पक्षाचा उमेदवार उभा करायचा अशा प्रकारची चर्चा सध्या महाविकास आघाडीत सुरु आहे.
