Advertisement
नगर : राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात हे एका पक्षात असताना देखील या दोन्ही नेत्यांमधील मतभेद अनेकदा समोर आले. आज दोन्ही नेते वेगवेगळ्या पक्षात आहे. मात्र या दोघा नेत्यांची पुढची पिढी आता राजकारणात सक्रिय झाली आहे. सुजय विखे यांनी संगमनेरमधून विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली तर दुसरीकडे थोरात यांची कन्या जयश्री थोरात देखील आता राजकारणात सक्रिय झाल्याने आगामी काळात थोरात आणि विखे यांची पुढची पिढी समोरासमोर येणार अशी चर्चा आहे. नगर लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर सुजय विखे यांनी संगमनेर विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. पक्ष निर्णय घेईल. मात्र, माझी तयारी आहे, असं सूचक व्यक्त करताना सुजय विखे यांनी एक प्रकारे बाळासाहेब थोरात यांना आव्हान दिलं आहे.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात या देखील सक्रिय राजकारणात सहभागी झाल्या आहेत. संगमनेर शहरात इंदिरा महोत्सव या नावाने महिलांसाठी विशेष उपक्रम राबवत त्यांनी महिलांना एकत्रित केलं. कार्यक्रमाच्या उद्घाटन सोहळ्यातच नवनियुक्त खासदार प्रणिती शिंदे यांनी भाषणात जयश्री थोरात यांना विधानसभेत पाठवण्याची इच्छा व्यक्त केली. यानंतर जयश्री थोरात विधानसभा निवडणूक लढवण्याच्या चर्चांना प्रारंभ झाला आहे.
