Advertisement
मुंबई : विधानसभा निवडणुकीसाठी आता वंचित बहुजन आघाडी 'ॲक्शन मोड'वर आली आहे. वंचित बहुजन आघाडीची 'निवडणूक समिती' ही सर्व शक्तिमान समिती समजली जाते. राज्य आणि प्रत्येक मतदारसंघातील पक्षाची रणनीती, उमेदवारांचे आलेले अर्ज, त्यांची छाननी आणि अंतिम उमेदवारी हे सर्व निर्णय ही समिती घेणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी या समितीच्या अध्यक्षपदी पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर यांची नियुक्ती करीत त्यांच्यावर मोठा विश्वास टाकला आहे.
या समितीत रेखा ठाकूर यांच्या मदतीला भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने आणि वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. धैर्यवर्धन पुंडकर यांची सहअध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यासोबतच पक्षाच्या समन्वय समितीत या तिघांनाही नेमण्यात आलं आहे. समन्वय समितीच्या अध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष रेखा ठाकूर याच असणार आहेत. तर अशोक सोनोने आणि डॉ. धैर्यवर्धन पुंडकर हे समन्वय समितीचेसुद्धा सदस्य असणार आहेत. याबरोबरच दोन्ही समित्यांच्या सदस्यपदी अरुण जाधव, दिशा पिंकी शेख, गोविंद दळवी आणि सोमनाथ साळुंखे यांचा समावेश करण्यात आला आहे. दोन्ही समित्या निवडणूक प्रचाराच्या तयारीची देखरेख करणार आहे. सोबतच मीडिया समिती, संशोधन विभाग आणि राज्य कोअर कमिटी यांच्याशी समन्वय साधण्याचं कामही या दोन्ही समित्या करणार आहेत.
