Advertisement
मुंबई : लोकसभा निवडणुकीतील चुकीपासून धडा घेत भाजपने यावेळी उमेदवार लवकर निश्चित केले आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, विधानसभा निवडणुकीसाठी भाजपचे 50 टक्के उमेदवार निश्चित झाले आहेत. भाजपने निवडलेल्या उमेदवारांना दसऱ्यानंतर पक्षश्रेष्ठींकडून फोन करुन तसे कळवण्यात येईल,अशी माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली.
भाजपचे केंद्रीय मंत्री आणि पक्षसंघटनेतील दुसऱ्या क्रमांकाचे नेते असा लौकिक असणाऱ्या अमित शाह यांनी नुकताच मुंबई दौरा केला. या दौऱ्यात अमित शाह यांनी महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांशी सखोल चर्चा केली. रविवारी रात्री सह्याद्री अतिथीगृहावर झालेली ही बैठक रात्री उशीरापर्यंत सुरु होती. या बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक महत्त्वाच्या मुद्द्यावर तसेच उमेदवारांच्या नावांबाबत चर्चा झाली. यामध्ये बहुतांशी उमेदवारची यादी झाली असून त्यांना नवरात्रौत्सवानंतर फोन जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत 25 जागांवर महायुतीतील पक्षांमध्ये मैत्रीपूर्ण लढत होण्याची शक्यता आहे. तोडगा निघण्याची शक्यता दिसत नसल्याने अशा जागांवर मैत्रीपूर्ण लढत व्हावी, जेणेकरुन वाद वाढणार नाहीत, असा प्रस्ताव महाराष्ट्र भाजपच्या नेत्यांनी मांडल्याचे समजते.
