Advertisement
मुंबई : राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत आज महत्त्वाचे 24 निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, कुणबीच्या तीन पोटजातींचा इतर मागास प्रवर्गात समावेश करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, ब्राह्मण आणि राजपूत समाजासाठी सरकारने नव्या महामंडळाला कॅबिनेटची मंजुरी दिली आहे. त्यामध्ये, ब्राह्मण समाजासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
ब्राह्मण समाजाच्या विकासासाठी या महामंडळाची स्थापना करण्यात आली असून या महामंडळाच्या स्थापनेसाठी अनेक दिवसांपासून ब्राह्मण समाजाने आंदोलने केली होती. अखेर आजच्या मंत्रीमंडळ बैठकीत यावर निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात आरक्षणाच्या मागणीवरुन सर्वच समाज आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर ब्राह्मण समाजाकडूनही विद्यार्थ्यांना शासकीय लाभ मिळवून देण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळाची मागणी करण्यात येत होती. त्यासाठी, अनेक ठिकाणी आंदोलनेही करण्यात आली आहेत. अखेर, विधानसभा निवडणुकांपूर्वीच्या आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत 24 महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये, परशुराम आर्थिक विकास महामंडळाला मंजुरी देण्यात आली आहे. तर, राजपूत समाजासाठी वीर शिरोमणी महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळालही (नियोजन) कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.
