Advertisement
गडचिरोली : अजितदादा गटाचे नेते, राज्याचे मंत्री धर्मरावबाबा अत्राम यांच्या घरातच आता बंड झालं आहे. त्यांची कन्या भाग्यश्री अत्राम आणि जावई ऋतूराज हलगेकर हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे धर्मरावबाबा चांगलेच संतापले आहेत. आपल्याच विरोधात आपली मुलगी विधानसभेला उभी राहणार असल्याने धर्मरावबाबा यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांनी काल तर जाहीर भाषणात आपल्या मुली आणि जावयाला प्राणहिता नदीत बुडवा असं आवाहनच अहेरीच्या मतदारांना केलं आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार काल गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी येथे होते. यावेळी एका सार्वजनिक कार्यक्रमात अजितदादा यांच्यासमोरच धर्मरावबाबा अत्राम यांनी मुलीच्या बंडावर संताप व्यक्त केला. आपला जावई आणि मुलीवर विश्वास ठेवू नका, असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं. शेवटचा श्वास असेपर्यंत एक मुलगी गेली तरी चालेल. मला दुसरी एक मुलगी आहे. मुलगाही आहे. माझा एक सख्खा भाऊ विरोधात गेला होता, तो आता सोबत आला आहे. चुलत भावाचा मुलगा माझ्या जोडीला आहे. एक मुलगी गेली तरी माझं कुटुंब माझ्यासोबत आहे. पूर्ण अत्राम घराणं या हलगेकर लोकांना नदीत टाकल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा धर्मरावबाबा यांनी दिला.
