Advertisement
मुंबई : राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या निवडणुकीत 'एकला चलो रे'ची भूमिका घेतली आहे. काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी 7 उमेदवारांची घोषणा केली आहे. आता राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित ठाकरे हे विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत.
सोमवारी मनसे नेते आणि सरचिटणीस यांची मुंबईतील राजगड कार्यालय येथे महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत मनसे नेत्यांनी अमित ठाकरे यांना निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली. त्यावर मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंचे पूत्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी आपल्याला लोकांसाठी जर काही करायचं असेल तर स्वतः संसदीय राजकारणात यायला हवं असं मनसे नेते आणि सरचिटणीस यांना सांगत मी देखील विधानसभेसाठी तयार आहे अशी तयारी दर्शवली.
अमित ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी दर्शवताच, ते कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. दुसरीकडे मनसेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या दोन विधानसभा मतदारसंघांमध्ये अमित ठाकरेंचे बॅनर लावले आहेत. या बॅनरमध्ये अमित ठाकरेंनी याच विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी, अशी आग्रही मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे.
माहीम, भांडुप, दिंडोशी,कलिना, चांदीवली आणि मागाठणे या मतदारसंघांमध्ये अमित ठाकरे यांनी निवडणूक लढवावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. या मतदारसंघामध्ये मनसेची चांगली ताकद आहे. पक्ष स्थापन झाल्यानंतर या तिन्ही मतदारसंघांमध्ये मनसेचे आमदार निवडून आले होते. या मतदार संघामध्ये मनसेला अजूनही पोषक वातावरण आहे.
