Advertisement
कोल्हापुर : भाजप नेते समरजित घाटगे यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश झाला. पक्षप्रमुख शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कोल्हापुरातील कागलमध्ये गैबी चौकात समरजित घाटगे यांचा भव्य पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी समरजित घाटगे यांच्याकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आलं. या कार्यक्रमात शरद पवार यांनी दणकेबाज भाषण केलं. शरद पवारांनी आपल्या भाषणात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला. तसेच समरजित घाटगे यांची उमेदवारी घोषित केली. यावेळी शरद पवारांनी समरजित घाटगे यांच्याबद्दल मोठी घोषणा केली. “तुम्ही समरजित घाटगे यांना आमदार करा. ते फक्त आमदार राहणार नाहीत तर त्यांना मंत्री करू”, अशी मोठी घोषणा शरद पवारांनी केली.
समरजित घाटगे यांच्यासाठी तुम्ही उपस्थित जबरदस्त संख्येने राहिलात. मी गैबी चौकात अनेकदा सभा घेतल्या, पण आजची गर्दी मी कधी पाहिली नाही. याचा अर्थ परिवर्तनाचा निर्णय जो समरजित घाटगे यांनी घेतला तो योग्य आहे. स्वर्गीय सदाशिवराव मंडलिक आणि स्वर्गीय बाबासाहेब कुपेकर यांनी दिलेली साथ विसरून चालणार नाही. मागे एकदा पक्ष फुटला त्यावेळी सदाशिवराव आणि बाबासाहेब यांनी पाच वर्षात पुन्हा पक्ष उभा करण्यासाठी प्रयत्न केला. कोल्हापूरची भूमी स्वाभिमान गहाण ठेवत नाही हे या सहकाऱ्यांनी दाखवून दिलं होतं, असं शरद पवार म्हणाले.
