Advertisement
भाजपकडे केली 10 ते 12 जागांची मागणी
नागपूर: आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी जागांची मागणी केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबाबत आठवलेंनी मोठं वक्तव्य केलं आहे. विधानसभा निवडणुकीत आमच्या पक्षाला किमान 10 ते 12 जागा द्याव्या, माझ्या पक्षासोबत मोठ्या प्रमाणात दलित मतदार आहेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
रामदास आठवले म्हणाले, आम्ही लोकसभेला 2 जागा मागितल्या होत्या, मात्र मिळाल्या नाहीत. आता विधानसभा निवडणुकीत आम्हाला 12 जागा द्याव्यात. विदर्भात किमान 4 जागा द्याव्या. महाराष्ट्रात आम्ही 18 जागांची यादी केली आहे. त्यापैकी 12 जागा द्याव्या. आम्हाला भाजपच्या कोट्यातून मानू नये, तर भाजप, शिंदे आणि अजित दादा तिघांनी आम्हाला त्यांच्या कोट्यातून 4 - 4 जागा द्याव्या, म्हणजे आम्हाला 12 जागा मिळतील. येणाऱ्या एनडीए सरकारमध्ये आम्हाला मंत्री पद द्यावे, तसेच 2 महामंडळ दावे अशी मागणी आठवलेंनी केली आहे.
प्रकाश आंबेडकर यांनी अनेक निवडणूक लढून ही त्यांच्या जागा निवडून येत नाही. त्यामुळे मी एकदा म्हणालो होतो, की त्यांनी एनडीएमध्ये यावे, त्यांच्या जागा ही निवडून येतील. त्यांना मंत्री करण्यासाठी मी प्रयत्न करेल. 1990 मध्ये प्रकाश आंबेडकर माझ्यासोबत राहिले असते, तर आमच्या किमान दहा-बारा जागा निवडून आल्या असत्या आणि उपमुख्यमंत्री पद आम्हाला मिळालं असतं. मात्र, तेव्हा ते आमच्या सोबत आले नाही. प्रकाश आंबेडकर यांनी थोडं सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे.
