#

Advertisement

Friday, September 20, 2024, September 20, 2024 WIB
Last Updated 2024-09-20T13:05:43Z
आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्रराजकीयशहर

माढ्यातून इच्छुकांची यादी वाढली : मोहिते पाटलांचा पाठिंबा ठरणार महत्वाचा

Advertisement

माढा : मतदारसंघात माढा, पंढरपूर आणि माळशिरस या तीन तालुक्यातील गावांचा समावेश आहे. यामध्ये पंढरपूरातील 42 गावांचा तर माळशिरसमधील 14 गावांचा समावेश आहे. तर माढ्यातील 78 गावांचा मतदारसंघात समावेश आहे. सलग 30 वर्ष माढ्याचा एकहाती गड काबीज करणारे आमदार बबनदादा शिंदे यांनी यावेळी मैदानातून माघार घेतली आहे. त्यांनी आपले पुत्र सोलापूर जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष आणि बबनदादा शुगर्सचे चेअरमन रणजितसिंह शिंदे यांनी मैदानात उतरवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, रणजितसिंह शिंदे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्यासाठी अनेकजण मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत. यामध्ये पंढरपूरचे अभिजीत पाटील, अकूलजचे शिवतेजसिंह मोहिते पाटील, माढ्याच्या नगराध्यक्षा मिनल साठे, आमदार बबनदादा शिंदे यांचे पुतणे धनराज शिंदे, शिवाजीराजे कांबळे, संजयबाबा कोकाटे, शिवाजीराव सावंत यांचा समावेश आहे.
शरद पवार यांचे निकटवर्तीय आमदार म्हणून बबनदादा शिंदे ओळखले जात होते. मात्र, अजित पवारांनी शरद पवार यांच्यापासून फारकत घेत भाजपशी घरोबा केला. यानंतर आमदार बबनदादा शिंदे यांनी देखील अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आणि माढा तालुक्यातील जनतेचा रोष वाढत गेला. माढ्यात बदल हवा आमदार नवा असा प्रचार होऊ लागला. हाच डाव साधत बबनदादा शिंदे यांच्या विरोधकांनी फायदा घेत वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे.
दरम्यान, माढा मतदारसंघावर मोहिते पाटलांचा देखील डोळा आहे. तुतारीकडून शिवतेजसिंह मोहिते पाटील हे या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे. त्यांनी मतदारसंघात दौरे, संवाद, बैठका सुरु केल्या आहेत. पण त्यांच्या आडून सध्या भाजपकडून विधानपरिषदेवर आमदार असणारे रणजितसिंह मोहिते पाटील हे तर खेळी करतायेत का? ते माढ्यातून निवडणूक लढवणार असल्याचीही चर्चा सुरु आहे. माढा मतदारसंघात तिकीट कोणालाही मिळो, मात्र, विजयसिंह मोहिते पाटलांचं मत विचारात घेतल्याशिवाय शरद पवार हे तिकीट देणार नाहीत हे देखील तितकच खर आहे.