Advertisement
पुणे : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांसाठीची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. भोसरीतील माजी आमदार विलास लांडे यांनीदेखील शरद पवारांची भेट घेतली होती. त्यानंतर, आता विलास लांडे यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी मोठी घोषणा केली आहे. विलास लांडे विधानसभेला तुतारी फुंकणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
अजित पवारांच्या पक्षातून संधी मिळणार नसल्याचे लक्षात येत विलास लांडे यांनी शरद पवारांकडून तुतारी फुंकण्याची तयारी दर्शवली आहे. आता, त्यांचे सुपुत्र विक्रांत लांडे यांनी याबाबत घोषणाच केली आहे. आजच्या शरद पवारांच्या भेटीनंतर विक्रांत लांडेंनी प्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळं अजित पवारांना बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवड मध्ये शरद पवार पुन्हा एक धक्का देणार, हे स्पष्ट झालंय. शरद पवारांनी तारीख दिली की विलास लांडे घड्याळाच्या हातानेचं तुतारी फुंकणार आहेत, असं विक्रांत लांडे आता ठामपणे सांगत आहेत. विलास लांडेंनी यापूर्वी ही अनेकदा शरद पवारांच्या भेटी घेतल्या आहेत. मात्र, त्यांनी स्वतःहून घरवापसीच्या प्रवेशावर कधीचं भाष्य केलेलं नाही, नेहमी त्यांनी संभ्रमाचं राजकारण खेळलेलं आहे. त्यामुळे जोपर्यंत विलास लांडे हातात तुतारी घेत नाहीत, तोपर्यंत त्यांचा प्रवेश निश्चित कसा मानायचा? अशी चर्चा यानिमित्ताने पुन्हा एकदा शहरात रंगलेली आहे.
