Advertisement
राष्ट्रवादी शरद पवार यांच्या व्यासपीठावर ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे दिसणार
मुंबई : येथे यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांच्या समवेत बहुजन रयत परिषदेचे राज्य कार्यकारणी सदस्य यांनी खासदार राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबाबत मात्र खुलास झाला नाही. शरद पवार यांनी मात्र ॲड. कोमलताई यांना काही सूचना वजा निर्देश केले असल्याने या विधानसभा निवडणुकीत ढोबळे कुटुंबिय किंगमेकरच्या भूमिकेत असून शकते, अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात सुरू आहे. प्रत्येक मतदार संघातून तुतारी या चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवाराला लक्ष्मणराव ढोबळे यांची साथ आवश्यक वाटत आहे त्यातच ॲड. कोमलताई साळुंखे-ढोबळे याही या पुढील काळात राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या व्यासपीठावर हजेरी लावणार आहेत. साहजकीच ढोबळे कुटुंबियांमुळे पवारांची ताकद वाढली आहे.
माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांनी दोन दिवसांपूर्वीच भारतीय जनता पक्षाला सोडचिट्टी देण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले होते. या पाठोपाठ कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी शरद पवार व सुप्रिया सुळे यांची भेट घेतल्यामुळे बहुजन रयत परिषदेच्या कार्यकर्त्यांमध्ये व ढोबळे समर्थकांत प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ढोबळे यांच्या या भूमिकेमुळे पंढरपूर, मंगळवेढा, मोहोळ, बार्शी, माळशिरस, सोलापूर, अक्कलकोट अशा ठिकाणी जिल्ह्यात मोठा राजकीय उलटफेर होणार आहे. महायुतीला याचे परिणाम भोगावे लागणार असून महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठी संधी मिळणार आहे. पंढरपूर, मंगळवेढा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून प्रशांत परिचारक यांना किंवा भगीरथ भालके यांना उमेदवारी मिळाली तर त्यांना विजयी करण्यासाठी ढोबळे यांचे योगदान महत्वपूर्ण ठरणार आहे.
भारतीय जनता पक्षामध्ये ढोबळे यांची उणीव मोठ्या प्रमाणात जाणवणार आहे. ढोबळे यांना सोलापूर जिल्ह्याचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अभ्यास असून खडा ना खडा माहिती आहे. 25 वर्षे आमदार तसेच मंत्रीपद भोगल्याशिवाय ढोबळे यांनी दोन वेळा लोकसभेची निवडणूक पंढरपूर मधून लढवली आहे तर उस्मानाबाद, बार्शी मधून एकदा लोकसभेची निवडणूक लढवली आहे. सोलापूर महापालिकेची निवडणूक एक हाती त्यांनी पुलोदला जिंकून दिली होती. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांना चाणक्य म्हणूनही ओळखले जाते. प्राध्यापक ढोबळे हे खोडील राजकीय मास्तर आहेत. हे ज्या राजकारणी नेत्यांना माहित आहे त्यांना त्यांच्या खोड्या माहित आहेत, त्यांच्या राजकीय कारकिर्दीत त्यांनी विरोधकांची अनेकदा उलथापालथ केली आहे. आता, या विधानसभेच्या निवडणुकीत ते करणार असणाऱ्या राजकीय खेळीमुळे त्यांना किती यश मिळणार याकडे सोलापूर जिल्ह्यातील राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

