Advertisement
जिल्हाधिकाऱ्यांकडे कोमलताई साळुंखे-ढोबळे यांची मागणी
सोलापूर : सोलापूर हे एक समृद्ध ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक वारसा असलेले शहर आहे. स्वातंत्र्य चळवळीत या शहराने महत्वाची भूमिका बजावली आहे. विशेष म्हणजे स्वातंत्र्यापूर्वीच म्हणजे 1930 मध्ये महापालिकेच्या इमारतीवर सर्वप्रथम राष्ट्रीय ध्वज फडकवणारी भारतातील एकमेव नगरपालिका होती. आता, अद्यावत विमानतळ सुरू झाल्यामुळे सोलापूरचा नावलौकिक जगभर पोहोचणार आहे. शिवाय व्यापार व पर्यटनाला चालना मिळणार आहे. हे शहर भारतातील सर्व प्रमुख शहरांशी हवाई मार्गाने जोडले गेले आहे. त्यामुळे स्वातंत्र्यासाठी जे हसत-हसत फासावर चढले, अशा हुतात्म्यांचे नाव सोलापूर विमानतळास दिले तर भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास जगभर पोहोचेल, अशी मागणी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांकडे बहुजन रयत परिषद, महाराष्ट्र राज्याच्या कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी केली आहे.
सोलापूर विमानतळास कोणाचे नाव द्यायचे हा नवा वाद आता सुरू झाला आहे. लोकांकडून अनेक नावे सुचविली जात आहेत. कोणी महात्म्यांची, आपल्या समाजप्रमुखांची तर कोणी धर्मगुरुंचे नाव सुचवत आहे. या मागील लोकभावना चांगलीच आहे, पण सोलापूर शहराला मल्लप्पा धनशेट्टी, किसन सारडा, जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन या चार हुतात्म्यांचा जाज्वल्य इतिहास आहे. जे देश स्वातंत्र्यासाठी फासावर चढले. देशासाठी त्यांनी सर्वस्वाची आहुती दिली. इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या विरोधात त्यांनी देशाच्या विविध भागात वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलने केली. त्यांच्या प्रतिकारामुळे ब्रिटीश सत्ता जेरीस आली. स्वातंत्र्यपूर्व काळात कापड उद्योगाचं शहर म्हणून ओळखले जाणाऱ्या सोलापूरमध्ये 12 जानेवारी हा दिवस हुतात्मा दिन म्हणून साजरा केला जातो. या हुतात्मांनी उभारलेल्या लढ्यामुळे सोलापूरकरांनी स्वातंत्र्याच्या 17 वर्ष आधीच म्हणजे 1930 मध्ये 4 दिवस स्वातंत्र्य अनुभवलं होतं. अशा हुतात्म्यांचे नाव विमानतळाला दिले गेले तर खऱ्या अर्थाने त्यांच्या बलिदानाचे सार्थक होईल आणि सोलापूर विमानतळ हुतात्म्यांच्या कर्तृत्वाची साक्ष देणारे स्मारक म्हणून जगासमोर येईल.
सोलापूरच्या नावलौकिकात भर घालण्यासाठी प्रशासनाने विमानतळास सोलापूरच्या हुतात्म्यांचे नाव द्यावे, या मागणीचे निवेदन बहुजन रयत परिषदेने सोलापूर जिल्हाधिकारी यांना दिले. यावेळी बहुजन रयत परिषदेच्या प्रदेशाध्यक्ष कोमलताई साळुंखे-ढोबळे व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
