Advertisement
अखेर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाच याचा आनंद
पुणे : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून अनेक साहित्यिक गेली अनेक वर्षे लढत होते. त्यांच्या या लढ्याला यश आले असून केंद्र सरकारने मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देऊन या भाषेच्या समृद्धीवर राजमान्यतेची मोहोर उमटवली आहे. मराठी भाषेचं सौंदर्य, सामर्थ्य आणि नजाकत काही औरच आहे. मराठी भाषेचं खुललेलं रूप बघायचं असेल, अनुभवायचं असेल तर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या सिध्दहस्त लेखणीने समृध्द झालेल्या कथा, कादंबऱ्यांच्या विश्वात डोकावून पाहावे लागेल. अण्णाभाऊंचे साहित्य म्हणजे मराठी भाषेचा अमूल्य असा खजिनाच आहे. मानवी भावभावनांना शब्दात बांधणे ही सोपी गोष्ट नाही. भाषेचं शब्दभंडार उघडावं लागतं. अचूक आणि योग्य शब्दांची निवड करावी लागते. अण्णाभाऊंचे भाषेवर प्रभुत्व आणि शब्दांवर पकड होती. जगण्याच्या अनुभूतीतून त्यांचं शब्दभंडार समृद्ध झालं होतं, अशी प्रतिक्रिया ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, याबाबत त्या लक्षवेधी बरोबर बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, अण्णाभाऊंच्या लेखणीत गोडवा होता, विद्रोह होता. प्रेम होतं. आग होती. आपलेपणाची ऊब होती. अन्यायाविरुद्ध चीड होती. अण्णाभाऊंनी मराठी भाषेचं सौंदर्य आणि सामर्थ्य कैक पटीनं वाढवलं, असं म्हटलं तर ती अतिशयोक्ती ठरणार नाही. अण्णाभाऊंनी मराठी भाषेचा झेंडा सातासमुद्रापार फडकविला. असे अनेक शब्द आहेत जे फक्त अण्णाभाऊंच्या साहित्यातच वाचायला मिळतात. शब्दाला प्रतिशब्द शोधायचा असेल तर अण्णाभाऊंची पुस्तकंच चाळावी लागतील, मराठी भाषेचं एवढं वैविध्य त्यांच्या साहित्यात बघायला मिळतं. मराठी भाषा कोणी समृध्द केली असेल तर ती अण्णाभाऊंसारख्या मातीशी नातं सांगणाऱ्या सिध्दहस्त लेखकांनी. सरकार साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न बहाल करुन साहित्यिकांचा गौरव करेल, हीच माफक अपेक्षा ऍड. कोमलताई साळुंखे-ढोबळे यांनी व्यक्त केली.
