Advertisement
मुंबई : महाराष्ट्रात तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची चर्चा रंगली असताना छत्रपती संभाजीराजेंच्या स्वराज्य संघटनेला निवडणूक आयोगाकडून पक्ष म्हणून मान्यता मिळाली असून पक्षाला आता निवडणूक चिन्ह देखील मिळाले आहे. अशी माहिती पक्षाचे सर्वेसर्वा छत्रपती संभाजीराजे आणि सरचिटणीस धनंजय जाधव यांनी दिली आहे.
छत्रपती संभाजीराजे यांची स्वराज्य संघटनेला आता निवडणूक आयोगाने सप्तकिरणांसह पेनाची निब हे निवडणूक चिन्ह दिले आहे. त्यामुळे स्वराज्य संघटना आता अधिकृतपणे पक्ष म्हणून नोंदविण्यात आला आहे. महाराष्ट्र स्वराज्य पक्ष म्हणून भारतीय निवडणूक आयोगाने ही मान्यता दिली आहे. त्यामुळे आजपासून स्वराज्य संघटनेचे रूपांतर अधिकृतपणे एका राजकीय पक्षात आज झाले असल्याची माहिती पक्षाचे सर्वेसर्वा छत्रपती संभाजीराजे यांनी समाज माध्यमांवर एका पोस्टच्या माध्यमातून दिली आहे.
पूर्वी तलवार हे ताकदीचे प्रतीक होते. आताच्या काळात लेखणी ही ताकदीची प्रतीक म्हणून ओळखली जाते. जेव्हा तलवारीने लढाया जिंकायच्या होत्या, तेव्हा आम्ही तलवारीने त्या जिंकल्या. आता लेखणीने लढाया जिंकण्याचा काळ आलेला आहे. आपला पक्ष व चिन्ह प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवावे, ही विनंती करत असल्याचे आवाहनही छत्रपती संभाजीराजे यांनी यावेळी केलं आहे.
