Advertisement
सोलापूर : राज्यातील सर्वात जास्त चर्चेत असलेला विधानसभा मतदारसंघ म्हणून माढा मतदारसंघाकडं पाहिलं जात आहे. आता माढ्याची लढाई ऊसाच्या दरावर येऊन पोहोचणार असे चित्र दिसत आहे. कारण, सोलापूर जिल्हा हा साखर कारखानदारांचा जिल्हा अशी ओळख आहे. यंदाची विधानसभा निवडणूक ही ऊस दराच्या दिशेने जाऊ लागली असून आमदार बबनदादा शिंदे यांचा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना व अभिजीत पाटील यांच्या विठ्ठल सहकारी साखर कारखाना या दोघांमध्ये दराची स्पर्धा विधानसभेचा आमदार ठरवणार असे चित्र दिसत आहे.
माढ्याचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे हे माढा तालुक्यातील सर्वात मोठे साखर सम्राट अशी ओळख असलेले नेते असून त्यांच्याकडे राज्यात सर्वाधिक गाळप करणारा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखाना आहे. याशिवाय मोहिते पाटील यांच्याकडून घेऊन विठ्ठलराव शिंदे कारखान्याचा भाग दोन बनवलेला विजय शुगर असे दोन सहकारी साखर कारखाने आहेत. यातील विठ्ठलराव शिंदे हा कारखाना सर्वाधिक गाळप करत असल्याने गेल्या वर्षी जवळपास 25 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप शिंदे केले होते. तर पंढरपूरच्या अभिजीत पाटील यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्यातून 10 लाख 81 हजार टन गाळप करीत तीन हजार रुपये भाव दिला होता. आता यावर्षी अभिजीत पाटील यांनी थेट साडेतीन हजाराचा भाव जाहीर केल्याने सर्वात मोठी कोंडी माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांची झाली आहे. अभिजीत पाटील यांनी साडेतीन हजार रुपये भाव जाहीर केल्यानंतर त्यांना मिळू लागलेला प्रतिसाद पाहून आमदार शिंदे यांनी अभिजीत पाटील यांच्या पेक्षा एक रुपया जास्त दर देण्याची घोषणा केली. आता शांत बसतील ते अभिजीत पाटील कसले त्यांनी लगेच विठ्ठल च्या सर्वसाधारण सभेत जर दुसऱ्यांनी एक रुपया जास्त दिला तर मी दोन रुपये जास्त देईन पण सर्वात जास्त दर हा विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचा असेल अशी घोषणा केल्याने आता माढ्याची निवडणूक ही ऊस दराकडे झुकू लागली आहे.
