Advertisement
मुंबई : वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे गटाचे आदित्य ठाकरेंविरोधात शड्डू ठोकलाय. वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार असल्याची माहिती त्यांनी स्वत: दिली आहे. शिवाय महायुतीतील शिवसेना आणि भाजपकडून उमेदवारी मिळण्यासाठी सदावर्ते यांनी पक्षश्रेष्ठींकडे मागणी केली आहे.
वरळी विधानसभा मतदारसंघातून 2019 मध्ये ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत 89248 मतं मिळवत आदित्य ठाकरेंनी मोठा विजय मिळवला होता. दरम्यान विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये आदित्य ठाकरे मंत्री देखील झाले होते. त्यामुळे आता वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्या ठाकरे हेच महाविकास आघाडीचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित मानले जात आहे. तर महायुतीकडून वकील गुणरत्न सदावर्ते निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत.
मनसेकडून संदीप देशपांडे यांचे नाव चर्चेत
वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरे आमदार आहेत. मात्र, आदित्य ठाकरेंविरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी वरळीमध्ये सभा घेतली होती. या सभेत राज ठाकरेंनी मनसे नेते संदीप देशपांडे यांचे तोंडभरुन कौतुक केले होते. तर दुसरीकडे राजे ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे देखील वरळीतून विधानसभा लढू शकतात, असंही बोललं जात आहे.
