Advertisement
वडगाव शेरी : मी तुमच्याच मनातील उमेदवार देणार असल्याचं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं. सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न काहींनी केला आहे. काहीही नसताना लोकप्रतीमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे. हे प्रकार राज्याला पुढे नेणारे नाहीत, असंही अजित पवार म्हणाले. काही लोकं इकडं-तिकडं जातात पण लोकशाही आहे, त्यावर मी टिप्पणी करणार नाही असे अजित पवार म्हणाले. वडगाव शेरी मतदासंघामध्ये अजित पवार यांच्या हस्ते विविध विकासकामांचं उद्धाटन झालं. यावेळी ते बोलत होते.
अजित पवार म्हणाले, एक लोकप्रतिनिधी ज्याने नगरसेवक म्हणून सुद्धा काम केलं आहे. सगळ्यांच्यामध्ये मिळून मिसळून राहणाऱ्या सुनील टिंगरेला बदनाम करण्याचा प्रयत्न काही लोकांनी केला. कुठलाही प्रकार झाला तर माझ्या पोलिसांना सूचना असतात की सगळ्यांना नियम सारखे लावा, अशा माझ्या सूचना असतात. सुनील टिंगरे यांनी 5 वर्ष चांगलं काम केलं आहे. त्याला पुढील वाटचालीच्या शुभेच्छा देतो असेही अजित पवार म्हणाले.
दरम्यान, कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघातावरुन सुनिल टिंगरे यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली होती. पुण्यातील बिल्डरपुत्राला वाचवण्यासाठी आमदाराने हस्तक्षेप केल्याचा आरोप करत सामाजित कार्यकर्त्या विनिता देशमुखांनी आमदार सुनील टिंगरेंकडे बोट दाखवलं होतं. या अपघातप्रकरणी टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव आणल्याचा आरोपही करण्यात आला होता.
