Advertisement
केंद्र सरकारने दिली नाव बदलला मंजूरी
अहिल्यानगर : औरंगाबादचे छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे धाराशीव आणि आता अहमदनगर जिल्ह्याचे अहिल्यानगर नामाकरण झाले आहे. गेल्यावर्षी राज्य सरकारने नाव बदलण्याचे आश्वासन दिले होते. ते पूर्ण करण्यात आले आहे. नगर जिल्ह्याचे नाव आता अहिल्यानगर करण्याला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे.
अहमदनगर जिल्हा आता अहिल्यानगर या नावाने ओळखला जाणार आहे. या निर्णयामुळे जिल्ह्यात आनंदाची लाट पसरली आहे. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी याविषयीची माहिती दिली आहे. त्यांनी समाज माध्यमावर ट्विट करत केंद्र सरकारचे आभार मानले आहे.
अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने अगोदरच केंद्र सरकारकडे पाठवला होता. आता ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या मागणीवर शिक्कामोर्तब करण्यात आले. केंद्र सरकारने राज्य सरकारच्या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल दिला. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूरी दिली. राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोशल मीडियावर याविषयीची माहिती दिली.
रेल्वे स्थानकाचे नाव बदलणार
अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर अहिल्यानगर करण्यास राज्य शासनाने मंजूरी दिली होती. त्यानंतर लागलीच येथील रेल्वे स्थानकांचं नाव बदलण्याच्या हालचाली झाल्या. एका महिन्यापूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी पत्रकार परिषदेत रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात येणार असल्याचे सांगितले होते. त्याचवेळी अहमदनगर जिल्ह्याचे नामांतरावर शिक्कामोर्तब होणार हे स्पष्ट झाले होते.
