Advertisement
मुंबई : राज्यातील सर्व महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. एकीकडे महाविकास आघाडीत या घटना घडत असतानाच अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीतही स्वबळावर निवडणुका लढण्याचं वारे वाहू लागले आहे. आज राष्ट्रवादीची बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी स्वबळाचा नारा दिला. महापालिका स्वबळावर लढली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. त्यामुळे राष्ट्रवादी स्वबळावर लढणार का? महाविकास आघाडीपाठोपाठ महायुतीलाही धक्का बसणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादीची माटुंग्यात आज बैठक होती. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने या बैठकीचां आयोजन करण्यात आलं होतं. या बैठकीला नवाब मलिक, आमदार सना मलिक आणि सिद्धार्थ कांबळे उपस्थित होते. या शिवाय पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नवाब मलिक यांनी स्वबळावर लढण्याची आग्रही मागणी धरली. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर या मुंबईत आपण कधीच 14 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आणू शकलो नाही. एकसंघ असतानाही आपण कधीच जास्त नगरसेवक निवडून आणले नाहीत. आता पक्षाचे दोन भाग झाल्यावर कार्यकर्त्यांच्या मनात चिंता आहे. कार्यकर्ते संभ्रमित आहेत. महापालिका निवडणुकीत स्वबळावर लढायचं की महायुतीत लढायचं हा संभ्रम आहे, असं नवाब मलिक म्हणाले.
