Advertisement
मुंबई : महाविकास आघाडीला लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या विजयानंतर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपतील अनेक नेत्यांनी तिकीट मिळणार नसल्याने पक्षाला रामराम करत महाविकास आघाडीमध्ये प्रवेश केला होता. मात्र विधानसभा निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर आता या नेत्यांना पुन्हा एकदा भाजपामध्ये घरवापसी करण्याचे वेध लागले आहेत. अनेक नेते भाजपमध्ये घरवापसी करण्याची शक्यता आहे. काही नेत्यांनी तर भाजप नेतृत्वाशी संपर्क देखील साधला असल्याचं बोललं जातंय. समरजित घाटगे, संजयकाका पाटील, राजन तेली, बाळ माने हे नेते भाजपमध्ये घरवापसी करण्यासाठी वेटींगवर असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
सध्या शिर्डीमध्ये भाजपचे 'घर चलो अभियान' सुरु आहे. यावेळी तिथे उपस्थित असणारे चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी संवाद साधताना भाजपची साथ सोडून गेलेल्या नेत्यांबद्दल प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजप पक्ष सोडून गेलेल्या कोणत्याही नेत्याला पुन्हा पक्षात घेताना तेथील स्थानिक नागरिकांना विश्वासात घेऊनच पक्ष प्रवेश केला जाईल. कारण महायुतीत सध्या कोणताही तणाव नाहीये. महायुती महत्वाची आहे. त्यामुळे सर्व निर्णय नेतृत्वाला विश्वासात घेऊन घेतले जातील अशी प्रतिक्रिया चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
