Advertisement
रायगड : जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे नेते भरत गोगावले आग्रही असताना त्यांच्याऐवजी अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या तसेच महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांना रायगडचं पालकमंत्रिपद सोपवण्यात आलं. यावरुनच शनिवारी रात्रीपासून राडा सुरू आहे. भरत गोगावले यांना डावलून आदिती तटकरे यांना रायगडचे पालकमंत्री पद देण्यात आल्याने रायगडमधील शिवसैनिक संतप्त झाले आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर महाडजवळ रात्री उशिरा शिवसैनिकांनी रस्त्यावर टायर जाळून या निर्णयाचा निषेध केला आहे. शिवसैनिकांकडून गोगावले यांचा जयजयकार करीत खासदार सुनील तटकरे यांचा निषेध करण्यात आला. शिवसैनिकांनी जवळपास 2 तास महामार्ग रोखून धरला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत शिवसैनिकांना बाजूला केलं आणि वाहतूक सुरळीत केली. सध्या जाळपोळ करण्यात आलेल्या परिसरामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त असून तणावपूर्ण शांतता आहे.
आम्ही शिवसेना भाजपच्या सहा आमदारांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटून तसं सांगितलं होतं. जिल्ह्यातही तसेच वातावरण तयार झालं होतं. आता जो पालकमंत्रिपदाबाबत निर्णय झाला आहे तो अनपेक्षित आणि मनाला न पटणारा आहे. यासंदर्भात वरिष्ठांशी चर्चा झालेली नाही. तरीही आमचे नेते एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल, असं भरत गोगावले म्हणाले आहेत.
