Advertisement
धनंजय मुंडे पहाटे 4 वाजता 'त्या' हॉटेलमध्ये पोहोचले
शिर्डी : अजित पवारांकडे पुण्याबरोबरच बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आल्यानंतर काही तासांमध्ये धनंजय मुंडेंनी शिर्डी गाठली आहे. धनंजय मुंडे पहाटे चार वाजता शिर्डीत दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे धनंजय मुंडे आणि अजित पवार दोघेही एकाच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
धनंजय मुंडेंनी प्रकृतीचं कारण देत शनिवारी पक्षाच्या नवसंकल्प शिबिराला अनुपस्थित होते. मात्र, आज अचानक पहाटे ते शिर्डीत दाखल झाले असून आज नवसंकल्प शिबिराला हजेरी लावणार आहेत. पालकमंत्रिपद डावलल्यानंतर धनंजय मुंडे पहाटे शिर्डीत दाखल झाले. शिर्डीतील 'हॉटेल सन अँड सँड'मध्ये ते मुक्कामी आहेत. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवारही याच हॉटेलमध्ये मुक्कामी आहेत. त्यामुळेच संकल्प शिबिराकडे रवाना होण्यापूर्वी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यात चर्चा झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आता 'सन अँड सँड'मध्ये नेमकी काय चर्चा होते याबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे.
अजित पवारांना बीडचं पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर धनंजय मुंडेंनी फेसबुकवरुन आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. बीड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व खूप खूप स्वागत. आदरणीय दादांच्या नेतृत्वात बीड जिल्ह्याच्या विकासाला पुणे जिल्ह्याप्रमाणे अधिकची गती आणि चालना मिळेल असा मला विश्वास आहे, असं धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे.
