Advertisement
बीड : जे काही सुरू आहे, त्याबद्दल मला काहीच माहिती नाही. मी माझ्या रोजच्या नियोजनाप्रमाणे काम करत आहे. त्यामुळे या गोष्टी माझ्यासाठी आता मॅटर करत नाहीत. माझ्यासाठी रोजचं काम महत्त्वाचं आहे, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. बीडमध्ये सध्या जो तणाव निर्माण झाला आहे त्याबद्दल मी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत चर्चा करणार आहे, असेही पंकजा मुंडेंनी म्हटले.
पंकजा मुंडे यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना बीडमध्ये सुरु असलेल्या प्रकरणावरुन विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्टपणे प्रतिक्रिया दिली.बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला एक महिना उलटला आहे. वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर कराड समर्थक आक्रमक झाले. त्यांनी अनेक ठिकाणी गोंधळ घालण्यास सुरुवात केली आहे. संतोष देशमुख यांच्या समर्थकांना न्याय मिळायला हवा, वाल्मिक कराडला शिक्षा झालीच पाहिजे, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या. बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. तर दुसरीकडे मात्र या जिल्ह्याच्या मंत्री असलेल्या पंकजा मुंडे यांनी मात्र या प्रकरणातून स्वत:ला लांब ठेवल्याचे पाहायला मिळत आहे.
