Advertisement
'माझी कामाची पद्धत वेगळी'
बीड : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार गुरुवारी सकाळीच बीडमध्ये दाखल झाले. यावेळी धनंजय मुंडे यांनी त्यांचं स्वागत केलं. पालकमंत्री झाल्यावर अजितदादांचा हा पहिलाच बीड दौरा आहे.
बीडच्या परिसरातील अनेक बातम्या वाचत आहोत. जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांवर कारवाई केली जाई. पण जिथं तथ्य नसेल तिथं कारवाईचा प्रश्न येत नाही' असं ते म्हणाले. उपस्थित अनेक पदाधिकाऱ्यांना उद्देशून बाबांनो माझी कामाची पद्धत थोडीशी वेगळी आहे, असं स्पष्ट शब्दांत सांगितलं. आपल्याकडून कोणती कामं मंजूर झाली तर ती कामं दर्जेदार असली पाहिजेत. त्यात काहीही वेडेवाकडे प्रकार झाले तर मी सहन करणार नाही, हा जनतेचा पैसा आहे तिथं कोणतीही गडबड होता कामा नये,असा थेट इशारा त्यांनी दिला.
मी काम करत असताना जातीपातीचा विचार करत नाही, असं यावेळी अजित पवार यांनी सांगत कार्यकर्त्यांकडूनही अशाच कामाची अपेक्षा असल्याची बाब अधोरेखित केली. विकासकामं करत असताना खंडणी मागण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा माझ्या कानावर आल्यास मकोका लावायलाही मी मागेपुढे पाहणार नाही, कोणतीही टोकाची भूमिका घेईन असा सज्जड दम कार्यकर्त्यांना दिला. बीडमध्ये अनेक वर्षांपासून सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या कार्यवाहीमध्येही दुरूस्ती करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला. चुकचीच्या पद्धतींना आळा घातलाच गेला पाहिजे या वाक्यावर त्यांनी जोर दिला.
