Advertisement
धनंजय देशमुखांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा आरोप
बीड : केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर या घटनेला दोन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी उलटला आहे. याप्रकरणी सात आरोपींवर मकोका लावण्यात आला आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचेही आरोप आहेत. तसेच या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे सध्या फरार आहे. याप्रकरणी विविध आरोप प्रत्यारोप होत असताना आता संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केले आहेत. संतोष देशमुख यांचा मृतदेह केजऐवजी कळबंकडे वळवण्यात आला होता. एका महिलेकडे घेऊन जायचं. छेडछाड झाली, कपडे फाडून घेतले असते, अंगाला जखम करून घेतल्या असत्या आणि या माणसाने असं केलं म्हणून या माणसाला समाजातून उठवलं असतं, असा त्यांचा प्लॅन होता, असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे.
संतोष देशमुख यांचा मृतदेह केजऐवजी कळबंकडे वळवण्यात आला होता, असा दावा केला जात आहे. यावर धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया दिली. अधिवेशनात सुरेश धस यांनी हा मुद्दा मांडला. त्यावेळेस त्यांनी ही माहिती सांगितली होती. पोलिसांनी भावाला जिथून घेतलं होतं, ती गाडी चिंचोलीला आली. चिंचोली फाट्याजवळ एक रस्ता केजकडे येतो आणि एक रस्ता कळंबकडे जातो. कळंबच्या दिशेने ती गाडी वळून जात होती. पण गावातल्या एक – दोन गाड्या पोलीसच्या पाठीमागे होत्या, हे पोलीसच्या लक्षात आल्यानंतर त्यावेळेस गाडीचा टर्न घेऊन त्यांना केजच्या रुग्णालयात घेऊन आले, असे धनंजय देशमुख म्हणाले.
CDR मध्ये स्पष्ट आहे...
हे पण त्यांच्या प्लॅनमध्ये होतं. 100 टक्के प्लॅनमध्ये होतं. ते प्री प्लॅन करून ते सगळं करतात. विदाऊट प्री प्लॅन करत नाहीत. गाडीत हत्यार टाकायचं हे नवीन नाही हे जर नवीन असेल तर आरोपी एक दोन दिवसात सापडले असते. जे CDR आले आहेत त्यामध्ये स्पष्ट आहे. त्यांच्या मुख्य माणसाचे 50 – 60 फोन आहेत. त्या दोन-चार दिवसात, हे कशासाठी कोणत्या कारणासाठी? चहा प्यायला आरोपी जातोय, त्यानंतर पोलीस स्टेशनच्या मोठ्या कॅमेरा एक तास बोलत बसतोय कट शिजवण्यासाठीच, दुसरं काय काम आहे त्यांचं, असेही धनंजय देशमुख म्हणाले.
